२३ नोव्हेंबरला विधानसभा निवडणुकीचे निकाल राज्यभरात जाहीर करण्यात आले. यामध्ये महायुतीने २३० जागांवर विजय मिळवला. यात भाजप १३२ जागा, शिवसेना शिंदे गटाला ५७ जागा आणि राष्ट्रवादी अजित पवार गटाला ४१ जागा मिळाल्या. तर महाविकास आघाडीला फक्त ४६ जागा मिळाल्या. यात काँग्रेस १६ जागा, ठाकरे गट २० जागा आणि राष्टवादी शरद पवार गटाला १० जागा मिळाल्या. तसेच इतर अपक्ष यांना १२ जागा मिळाल्या आहेत. त्यामुळे राज्यात महायुतीची सत्ता येणार हे आता निश्चित झाले आहे. महाराष्ट्रात सध्या सत्तास्थापनेच्या घडामोडींना वेग आला आहे. त्यात आज महाराष्ट्राचे काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे पत्रकार परिषद घेत आहेत. यावेळी एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानाबाहेर शिवसेना कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली आहे.
पत्रकार परिषदेत काय म्हणाले एकनाथ शिंदे?
हा महायुतीचा खूप मोठा विजय आहे. महायुतीने जे केलेलं काम आहे आणि लोकांनी जो महायुतीवर विश्वास दाखवलाय तो महत्त्वपूर्ण आहे. महायुतीने कल्याणकारी योजना सुरु केल्या आहेत, त्यामुळे मला वाटतंय की हा जनतेचा विजय आहे. अशी भूमिका यावेळी एकनाथ शिंदे यांनी मांडली. आम्ही पत्रकारांचे विषय सोडवले. राज्यात पायाला भिंगरी लावून फिरलो. मी सामान्य कुटुंबातून आलोय. मी कार्यकर्ता आहे, कार्यकर्ता होतो आणि कार्यकर्ता राहणार. सर्व घटकांसाठी आम्ही काम करतोय. अनेक प्रकल्प आणि कल्याणकारी योजना राबवल्या. बाळासाहेबांचे विचार आणि दिघेसाहेबांची शिकवण घेऊन पुढे गेलो. अडीच वर्ष पंतप्रधान मोदी आणि अमित शहा पाठीशी भक्कमपणे उभे राहिले. मला काय मिळालं यापेक्षा महाराष्ट्राच्या जनतेला काय मिळालं, हे महत्त्वाचं आहे. जनतेचं प्रेम मिळालं, सर्वांना मी जवळचा वाटलो. जनतेने मला आपलंस केलं. लोकप्रियतेमध्ये मी वरचढ चढलो ते फक्त जनतेमुळे. मी महाराष्ट्राच्या जनतेसाठी काम केलं. अडीच वर्षाच्या काळात केंद्र सरकार माझ्या पाठीशी उभं होतं. केंद्राने निधी दिला म्हणून सर्व सोयीने होऊ शकलं. आमच्यात कसलाही अडसर नाही.
यावेळी एकनाथ शिंदे यांनी बोलताना मुख्यमंत्रीपद सोडण्याचे संकेत दिले. पत्रकार परिषदेत एकनाथ शिंदे यांनी समारोपाची भाषा केली. सगळ्या पदांपेक्षा लाडक्या बहिणींचा ‘सख्खा लाडका भाऊ’ हे पद माझ्यासाठी महत्वाचं असल्याचे यावेळी एकनाथ शिंदे यांनी सांगितले. सत्तास्थापन करताना माझी अडचण होणार नाही. मी काहीही ताणून ठेवलेलं नाही. काल मी नरेंद्र मोदी आणि अमित शहांना फोन केला होता. त्यामुळे नरेंद्र मोदी आणि अमित शहा जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य असणार असल्याचे एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
हे ही वाचा:
Eknath Shinde पत्रकार परिषदेतून होणार व्यक्त, नेमकं काय बोलणार याकडे राज्याचं लक्ष
Eknath Shinde यांनी महायुतीपुढे टाकली नवी गुगली; म्हणाले,”मुख्यमंत्रीपद मिळणार नसेल तर…”