बुलढाणा तालुक्यातील येळगाव येथील विष्णू गडाख या शेतकऱ्याने गेल्या दहा वर्षांपासून आपल्या अर्ध्या एकराच्या जमिनीमध्ये ४५ प्रकारच्या विदेशी भाजीपाला पिकवून दरमहा २५ ते ३० हजार रुपये कमवत आहे. त्यामुळे त्यांच्या या अभिनव प्रयोगाने त्यांना लाखोंचे उत्पन्न मिळवून दिले असून, जिल्ह्यात त्यांची एक वेगळी ओळख निर्माण झाली आहे. त्यामुळे आता फॉरेनची भाजी खायची, विदेशात कशाला जायचे, ती तर बुलढाणा तालुक्यातही सहज उपलब्ध होईल.
येळगाव येथील विष्णू गडाख यांचे बी. ए. पर्यंत शिक्षण घेऊन चार ते पाच चित्रपटात काम करून देखील त्याचा मोबदला पाहिजे तसा मिळत नसल्याने गडाख यांनी आपल्याकडील अर्धा एकर शेतात भाजीपाला शेती करणे पसंद केले. देशी भाजीपाला घेत असताना अनेकदा भावात होणारी घसरण बघता कर्जाचा बोजा वाढू लागला. त्यांनी देशी भाजीपाला शेतीला विदेशी भाजीपाला शेतीची जोड देण्याचा १० वर्षापूर्वी घेतलेला निर्णय आज लाखमोलाचे उत्पन्नाचे स्त्रोत बनला आहे.
आज त्यांच्या अर्धा एकर शेतात देशी भाज्यासह विदेशी शलगम, लोलोरोसा लेट्युस्, आईसबर्ग लेट्स, यलो झुकिनी, ग्रीन झुकिनी, बेबी कॉर्न, कॉलीफ्लॉवर, ऑरेंज कॉलीफ्लॉवर, फेनल पोक, चोई चायनीज कॅबेज, ब्रोकली सॅलरी, पत्ता लेमन, बेसिल बटर, नट चेरी, टोमॅटो पॅनल, चक्री, आवळा, भोकर, फणस, सुरणकंद, अरबी कंद, ब्रुसल्स स्प्राऊट, नवल कोल यासह इतर भाजीपाल्याची शेती गडाख यांनी बहरविली आहे. यातील अनेक भाज्या विविध आजारावर गुणकारी आहेत हे पटवून देण्यासाठी गुगल वरून माहितीपत्रक डाऊनलोड करत ग्राहकांना आकर्षित केले आहे. मोठ्या प्रमाणात भाजीपाला उत्पादन झाल्यास पुणे संभाजीनगर ते पाठवत असतात त्यासाठी त्यांना पत्नी अरुणा गडाख यांची मोलाची साथ लाभली असल्याची माहिती विष्णू गडाख यांनी दिली आहे.