सध्या देशातील बहुतांश राज्यांत पावसाने (Rain) पुन्हा आगमनाला सुरुवात केली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा बरसायला सुरुवात केली आहे. हवामान विभागाच्याच्या माहितीनुसार, राजधानी दिल्लीसह (Delhi) अनेक राज्यांत पुढील तीन दिवस पाऊस पडणार आहे. बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे, उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, पश्चिम बंगाल, दक्षिण भारत आणि ईशान्य राज्यांमध्ये ०६ सप्टेंबर ते ०९ सप्टेंबर दरम्यान मुसळधार पाऊस पडू शकतो. कमी दाबाचे क्षेत्र दक्षिण ओडिशा आणि उत्तर आंध्र प्रदेश दरम्यान किनारपट्टीपासून दूर आहे. विभागाने सांगितले की, त्याच्या प्रभावामुळे ओडिशात मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, पश्चिम बंगालमध्ये विजांचा कडकडाट आणि वादळामुळे आज आणि उद्या म्हणजेच (०६ ते ०७ सप्टेंबर रोजी) पश्चिम बंगालमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. तर, ओदिशा, झारखंड आणि अंदमान निकोबारमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. त्यामुळे ओदिशातील सखल भागांत पाणी साचण्याचा आणि शहरी भागांत वाहतूक कोंडीचा इशारा देण्यात आला आहे.
आज (०६ सप्टेंबर रोजी) पश्चिम उत्तर प्रदेशात आज आणि उद्या पूर्व उत्तर प्रदेशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. याबरोबरच पूर्व राजस्थानमध्ये ०७ आणि ०८ सप्टेंबरला आणि उत्तराखंडमध्ये ०८ आणि ०९ सप्टेंबर रोजी हलक्या रिमझिम ते मध्यम आणि मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगडमधील लोकांनाही पुढील तीन दिवस उष्णतेपासून दिलासा मिळणार आहे. ०६ ते ०९ सप्टेंबर दरम्यान पावसामुळे वातावरण आल्हाददायक राहील. आयएमडीनेही मुसळधार पावसाचा इशारा दिला आहे.
ईशान्येकडील राज्यांमध्येही ०९ सप्टेंबरपर्यंत पाऊस पडण्याचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. आसाम आणि मेघालयमध्ये ०८ आणि ०९ सप्टेंबर आणि नागालँड, मणिपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्ये ०७ ते ०९ सप्टेंबर दरम्यान पाऊस अपेक्षित आहे. मुसळधार पडणाऱ्या पावसाचा अंदाज घेत भारतीय हवामान विभागाने नागरिकांना घरीच थांबण्याचा सल्ला दिला आहे. याशिवाय जर, काही अत्यंत महत्त्वाचे काम असेल तरच घराबाहेर पडा अशा इशाराही उत्तराखंडमधील नागरिकांना देण्यात आला आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपापली काळजी घेणं गरजेचं आहे.
हे ही वाचा:
जन्माष्टमीला दाखवा आरोग्यदायी आणि स्वादिष्ट नैवैद्य
सरकारचे शिष्ट मंडळ जालन्यात दाखल, घेणार मनोज जरांगे यांची भेट