मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज आग्रा किल्ला, उत्तर प्रदेश येथे ‘शिवजन्मोत्सव संपूर्ण भारतवर्ष का २०२५’ कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती दर्शवत उपस्थित शिवप्रेमींना छत्रपती शिवाजी महाराज जन्मोत्सवाच्या शुभेच्छा देत संबोधित केले.
छत्रपती शिवाजी महाराज स्वाभिमानाने उभे राहिलेल्या आग्रा येथील किल्ल्यात शिवजन्मोत्सव साजरा करण्याची संकल्पना मांडणाऱ्या विनोद पाटील यांचे आभार मानत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राजमाता जिजाऊ माँसाहेब यांनी दिलेल्या शिकवणीप्रमाणे छत्रपती शिवाजी महाराज यांनी तलवार हाती घेतली, बारा बलुतेदार, अठरापगड जातीतील मावळ्यांना एकत्र केले आणि हिंदवी स्वराज्याची स्थापना केली. यावेळी बोलताना आग्र्यात जिथे छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं होतं, तिथं शिवरायांचं भव्य स्मारक उभारणार आहे, अशी घोषणा देखील मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. तसंच हे शिवस्मारक पाहण्यासाठी ताजमहालपेक्षा अधिक लोक नाही आले तर नाव बदलून ठेवा, असंही ते म्हणाले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या संबोधनातून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पराक्रमाचे वर्णन केले. औरंगजेबाने आग्रा येथील भेटीवेळी केलेला अपमान सहन न करता छत्रपती शिवाजी महाराजांनी भर दरबारात गर्जना केली, त्यानंतर औरंगजेबाने छत्रपती शिवाजी महाराज यांना नजरकैदेत ठेवले व तिथून शिवरायांनी चाणाक्षपणे सुटका करुन घेतली, नंतर स्वराज्यात पुन्हा येऊन गेलेले २४ किल्ले परत मिळवले. शिवरायांना नजरकैदेत ठेवण्यात आलेल्या रामसिंगची कोठी म्हणजे आताच्या मीना बाजार येथे ताज महालपेक्षाही अधिक पर्यटक भेट देतील, असे स्मारक उभारण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून पुढाकार घेणार असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
नेमकं काय म्हणाले देवेंद्र फडणवीस?
आग्र्यातील रामसिंगची कोठी ज्या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. ती कोठी आज मीना बाजार या नावानं ओळखली जाते. त्यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्र सरकार ही जमीन अधिग्रहित कारेन आणि तिथं छत्रपती शिवाजी महाराजांचं भव्य स्मारक उभारेल. मी स्वतः उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी यासंदर्भात बोलेल. एकदा तिकडे स्मारक होऊ द्या, आईशप्पथ घेऊन सांगतो, ताजमहालपेक्षा जास्त लोक छत्रपती शिवाजी महाराजांचं हे भव्य स्मारक पाहण्यासाठी येतील”, तसंच महाराष्ट्र सरकार औरंगजेबाच्या नजरकैदेतून छत्रपती शिवाजी महाराजांच्या सुटकेचा दिवस युक्ती दिवस म्हणून साजरा करणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.