छत्रपती संभाजीनगर शहरात बागेश्वर धामचे धीरेंद्र शास्त्री यांच्या तीन दिवसीय कार्यक्रमाची बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी सांगता झाली. दरम्यान याच कार्यक्रमात काही मुस्लीम कुटुंबांनी घरवापसी करत हिंदू धर्मात प्रवेश केला. अहमदनगर येथील जमीर शेख याने त्यांच्या कुटुंबातील एकूण ९ सदस्यांनी शास्त्रींच्या हस्ते दीक्षा घेत पुन्हा हिंदू धर्मात प्रवेश केला आहे. तर, छत्रपती संभाजीनगरच्या हिंदू धर्मियांना आणखी १० लोकांची भेट देऊन जात असल्याचं बागेश्वर धाम यांनी यावेळी सांगितलं. तसेच, हे सर्व १० लोकं त्यांच्या स्वतःच्या इच्छेने हिंदू धर्मात दाखल झाले आहेत, असं सुद्धा बागेश्वर धाम म्हणाले.
दरम्यान, जमीर शेख यांनी हिंदू धर्म स्वीकारतांना बागेश्वर धाम यांचे आभार देखील मानले. तर, लहानपणापासून आपण हिंदू रिवाजानुसार पूजापाठ करत आलो त्यामुळे हिंदू धर्मावरील श्रद्धेमुळेच आपण धर्मांतर करीत असल्याचे शेख म्हणाले. एवढंच नाही तर आपल्या दोन्ही मुलींचे विवाह सुद्धा हिंदू धर्मात करून दिल्याचं शेख यांनी सांगितलं. बागेश्वर धाम यांचे अनेक व्हिडिओ आपण मोबाईलवर पहिले आणि आपल्यातील सनातनी जागा झाला. त्यानंतर बजरंग दलातील पदाधिकारी यांच्या मदतीने आपण आज इथे पोहचले असून, पुन्हा हिंदू फहारमत घरवापसी करत असल्याचे शेख म्हणाले
‘हिंदु हृदयाचार्य’ म्हणून धीरेंद्र शास्त्रींना उपाधी
सकल हिंदु जनजागरण समितीतर्फे धीरेंद्र शास्त्री यांना ‘हिंदु हृदयाचार्य’ ही उपाधी देत असल्याचे डॉ. भागवत कराड यांनी या कार्यक्रमावेळी जाहीर केले. यावेळी, प. पू. धीरेंद्र महाराज पुढे बोलताना म्हणाले, अंजनीपुत्र पवनसूत हनुमान म्हणजे बलबुद्धी, विद्या, आठ सिद्धी, ज्ञान आणि नवनिधींचे दाता आहेत. त्यांची खंड न पडता सेवा करत रहा , हनुमान चालीसाचे नित्यनियमाने पठण करा. बजरंगबली तुमचे सगळे संकटांचे निवारण करतील.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी दौरा टाळला…
छत्रपती संभाजीनगर शहरातील रेल्वे स्टेशन भागातील अयोध्या मैदानात बागेश्वर धाम यांचे दरबार भरले होते. त्यांच्या याच कार्यक्रमाचे बुधवारी ८ नोव्हेंबर रोजी सांगता झाली. मात्र, बुधवारी या कार्यक्रमाच्या आरती आणि शुभसंदेशसाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस येणार होते. मात्र, ते वेळेअभावी पोहचू शकले नसल्याचे कार्यक्रम आयोजकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, ज्या संभाजीनगर शहरात बागेश्वर धाम यांचा दरबार भरला आहे, त्याच संभाजीनगर येथे मराठा आरक्षण उपोषणकर्ते मनोज जरांगे यांच्यावर देखील रुग्णालयात उपचार सुरु आहे. त्यामुळे संभाजीनगर शहरात येणारे उपमुख्यमंत्री फडणवीस मनोज जरांगे यांची भेट घेणार अशी सकाळपासूनच चर्चा होती. मात्र, मराठा समाजाचा देवेंद्र फडणवीस यांना होत असलेला विरोध, त्यात ओबीसी-मराठा असा वाद पाहता फडणवीस यांनी संभाजीनगरचा दौरा टाळला असल्याची चर्चा आहे.
हे ही वाचा :
आजचे राशिभविष्य, ०९ नोव्हेंबर २०२३; मानसिक ताणतणावर मात करण्यासाठी…
राष्ट्रवादी पक्ष कोणाचा याबाबत निवडणूक आयोगात आज सुनावणी