spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

“जळगाव जिल्ह्यातील ऑनर किलिंगची घटना माणुसकीला काळीमा फासणारी”; आरोपींवर कडक कारवाई करण्याचे नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

पिंप्राळा हुडको, जिल्हा जळगाव येथे राहणाऱ्या मुकेश रमेश शिरसाठ वय वर्ष २७ या तरुणाची प्रेमविवाह केल्याने हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. ही घटना रामानंद नगर पोलीस स्टेशन हद्दीत घडली असून मुकेश शिरसाठ व पूजा सोनवणे यांचा चार ते पाच वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. पण त्यानंतर पूजाच्या घरच्यांसोबत मुकेश शिरसाठचे वारंवार वाद आणि खटके उडत होते. त्यावरून पोलीस स्टेशनमध्ये तक्रार आणि एनसी दाखल करण्यात आल्या आहेत. पण पळून जाऊन लग्न केल्याचा राग अजूनही पूजाच्या नातेवाईकांच्या मनात होता, या संतापातून त्यांनी मुकेशची निर्घृणपणे हत्या केली. या गंभीर घटनेची तत्काळ दखल उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी घेतली असून जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जळगाव आणि पोलीस अधीक्षक जळगाव यांना कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.

सदर घटनेदिवशी मृत मुकेश शिरसाठचे पूजाच्या घरच्यांसोबत वादविवाद झाले होते. त्यावेळी एकूण आठ-नऊ लोकांपैकी एकाने त्याच्यावर कोयत्याने हल्ला केला आणि जागेवरच त्याचा जीव गेला. याचा एफआयआर दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. ‘ऑनर किलिंगची ही घटना संतापजनक आणि माणुसकीला काळीमा फासणारी आहे’; असे म्हणत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी या अनुषंगाने काही महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत. हा प्रेमविवाह होऊन चार-पाच वर्ष झाली होती त्याचबरोबर मयत मुकेश शिरसाठ व त्याच्या सासरची मंडळी यांच्यात सतत वादविवाद होत असल्याने संबंधित पोलीस स्टेशनला वेळोवेळी एनसी तक्रार दाखल करण्यात आली होती. ही बाब विचारात घेता या प्रकरणामध्ये वेळोवेळी पोलिसांमार्फत काय कार्यवाही करण्यात आली आहे याबाबत माहिती सादर करावी.

ऑनर किलिंग टाळण्याच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासन व पोलीस विभागामार्फत काय कार्यवाही यापूर्वी करण्यात आली आहे याबाबत माहिती सादर करावी. मयत मुकेश शिरसाठ याच्या कुटुंबास आवश्यक संरक्षण व सुरक्षागृहाची व्यवस्था गरजेनुसार पुरवण्यात यावी. साक्षीदार संरक्षण कायद्यांतर्गत साक्षीदारास आवश्यक संरक्षण पुरविण्यात यावे. आरोपीला कठोर शिक्षा होण्याच्या दृष्टिकोनातून आवश्यक व ठोस साक्षी पुरावे मुदतीत संकलित करून चार्जशीट वेळेत दाखल करण्यात यावी. तसेच उर्वरित आरोपींना तत्काळ अटक करण्यात यावी. याप्रकरणी अनुभवी निष्णात सरकारी वकिलांची नेमणूक करण्यात यावी. मयत मुकेश शिरसाठ याच्या कुटुंबास सामाजिक अर्थसहाय्य योजनेमधून नियमानुसार लाभ देण्याबाबत आवश्यक कार्यवाही करण्यात यावी. जिल्ह्यामध्ये अशा प्रकारच्या घटनांची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी स्वयंसेवी संस्थांमार्फत समाज प्रबोधन व समुपदेशन कक्षाच्या माध्यमातून कार्यवाही करण्यात यावी. तसेच, ‘याप्रमाणे कार्यवाही करून उपसभापती कार्यालयास या संदर्भातील अहवाल वेळोवेळी सादर करण्यात यावा’ असेही डॉ. नीलम गोऱ्हे यांनी सांगितले.

Latest Posts

Don't Miss