रासायनिक खतांच्या किमती आधीच जास्त असताना खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून दरवाढ जाहीर केली आहे. त्यानुसार रासायनिक खतांच्या किमतीमध्ये ५० रुपयांपासून ते ३०० ते ३५० रुपयांची वाढ होणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना अतिरिक्त आर्थिक भार सहन करावा लागणार आहे. शेतकऱ्यांना आधीच त्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारभाव मिळत नसल्याने आर्थिक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
शेतकरी अगोदरच त्याच्या शेतमालाला भाव नसल्याने आर्थिक संकटात सापडला आहे. वाढलेल्या महागाईने त्रस्त झालेल्या शेतकऱ्यांना आता नव्या वर्षात वाढणाऱ्या खतांच्या किमतीला सामोरे जावे लागणार आहे. हवामान बदलामुळे शेतकऱ्यांना अगोदरच आर्थिक समस्यांना सामोरे जावे लागत आहे, त्यातच आता वाढणाऱ्या रासायनिक खतामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत आणखी भर पडणार आहे.
खरीप हंगामात झालेले नुकसान कसे भरून काढावे, हा प्रश्न शेतकऱ्यांना सतावत असताना कसेबसे रब्बी हंगामात पेरणी केली. त्यातच ढगाळ वातावरण असल्यामुळे रोगाचा प्रादुर्भाव वाढला. आता अचानक रासायनिक खतांचे भाव वाढल्याने शेतकरी चिंताग्रस्त झाले आहेत. सोयाबीनचे दर वाढतील, या अपेक्षेने शेतकऱ्यांनी शेतमालाची विक्री थांबवली होती. मात्र, उलट दर कमी झाले. खत उत्पादक कंपन्यांनी १ जानेवारी २०२५ पासून रासायनिक खतांच्या किमती वाढवल्या आहेत. वाढीव दरानुसार डीएपी डाय अमोनिया फॉस्फेट खताची किंमत प्रती बॅग १ हजार ३५० रुपयांवरून १ हजार ५९० रुपये झाली आहे. तर १०:२६:२६ आणि १२:३२:१६ या खतांच्या किमती १४७० रुपयांवरून १७२५ रुपये होणार आहेत. तर सुपर फॉस्फेट ४७० वरून ५२० रुपयांपर्यंत दर वाढणार आहेत. या नवीन वर्षात सुरुवातीलाच शेतकऱ्यांवर आर्थिक संकट आल्यामुळे शेतकरी धास्तावला आहे.
हे ही वाचा: