सध्या मुंबईतील टोरेस कंपनीच्या कथित आर्थिक घोटाळ्यामुळे महाराष्ट्रात एकच खळबळ उडाली आहे. या कंपनीने गुंतवणुकीवर घसघसीत परतावा देण्याचे आश्वासन देऊन लोकांची कोट्यवधी रुपयांची फसवणूक केल्याचं म्हटलं जातंय. हा कथित घोटाळा समोर आल्यानंतर गुंतवणूकदारांनी या कंपनीविरोधात गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, ही कंपनी गुंतवणूकदारांना कशा प्रकारे लुटत होती, याच्या अनेक चर्चा रंगल्या आहेत. असे असताना आता लोकांची लूट करण्यासाठी त्यांनी वापरलेल्या आकर्षक योजनेची माहिती समोर आली आहे.
टोरेस ज्वेलरीच्या मुंबईत अनेक ठिकाणी शाखा होत्या. ग्रँट रोड, नवी मुंबई, कल्याण, मीरा रोड अशा मोक्याच्या ठिकाणी या कंपनीने आपल्या शाखा उघडल्या होत्या. मात्र हा घोटाळा समोर आल्यानंतर पोलिसांनी कंपनीतील उच्चपदस्थ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. तर दुसरीकडे या कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून या कथित घोटाळ्याला कंपनीचे सीईओ तौसीफ रेयाज यांना जबाबदार धरलं आहे. ‘तौसीफ रेयाज तसेच त्यांच्या सहकाऱ्यांनी मिळून अनेक फसव्या योजना राबल्याचे आमच्या याआधीही निदर्शनास आले होते. यासह गेल्या अनेक महिन्यांपासून ते कंपनीचे पैसे लुबाडत असल्याचेही आम्हाला समजले आहे,’ असे या कंपनीने सोशल मीडियाच्या माध्यमातून म्हटले आहे.
या वृत्तसंकेतस्थळाने दिलेल्या माहितीनुसार हि कंपनी गुंतवणूकदारांना भरघोस परताव्याच्या वेगवेगळ्या ऑफर्स द्यायची. तुम्ही एक लाख रुपये गुंतवणूक केली तर मोईसॅनाईट स्टोनच्या पेंडटवर १० हजार रुपयांची सूट दिली जायची. तसेच तुम्ही केलेल्या गुंतवणुकीवर आम्ही ६ टक्क्यांनी परतावा देऊ, असे आश्वासनही या कंपनीकडून दिले जायचे. ही कंपनी फेब्रुवारी २०२४ मध्ये चालू झाली होती. पुढील महिन्यात या योजनेला एक वर्षे पूर्ण होणार होते. मात्र त्याआधीच लोकांची कथितपणे फसवणूक होत असल्याचे समोर आले आहे. या दरम्यान, फसवणुकीचा हा कथित प्रकार समोर आल्यानंतर भारतीय न्याय संहितेच्या कलम ३१८ (४) , ३१६ (५), ६१ तसेच महाराष्ट्र ग्राहक संरक्षण कायद्याच्या कलम तीन आणि चार अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांच्या मतानुसार या योजनेच्या माध्यमातून फसवणूक झालेल्यांची संख्या आगामी काळात वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे या प्रकरणात नेमके काय होणार? याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे.
हे ही वाचा:
आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य