‘जागतिक मातृभाषा दिन’ २१ फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. याचा उद्देश विविध भाषांचा संरक्षण आणि संवर्धन करणे, तसेच मातृभाषेतील विविधता आणि सांस्कृतिक वारसा यांचे महत्त्व अधोरेखित करणे आहे. याला युनेस्कोने (UNESCO) १९९९ मध्ये अधिकृत मान्यता दिली होती. आता तिथपासून हा दिवस साजरा करण्यात येत आहे. त्यानंतर संयुक्त राष्ट्र संघटनेच्या आमसभेने २००२ साली मान्यता दिली. प्रत्येक भाषा ही संवादाचे माध्यम आहे, त्याचप्रमाणे वेगवेगळ्या देशात वेगवेगळ्या भाषा बोलल्या जातात. अशातच पाकिस्तान एकत्रित असताना त्यावेळचे पूर्व पाकिस्तान म्हणजे आजच्या बांग्लादेशच्या (Bangladesh) नागरिकांनी त्यांच्या मातृभाषेसाठी दिलेल्या लढ्याच्या सन्मानार्थ हा दिवस साजरा केला जातो.
बांग्लादेशी नागरिकांचा लढा
आंतराष्ट्रीय मातृभाषा दिवस हा बांग्लादेशच्या पुढाकाराने सुरू करण्यात आला असे म्हटले जाते. २१ फेब्रुवारी १९५२ रोजी बांग्लादेशातील म्हणजे (पूर्व पाकिस्तान) लोकांनी त्यांची मातृभाषा असलेल्या बांग्लाभाषेला मान्यता मिळाली म्हणून पाकिस्तानच्या सत्ताधाऱ्यांविरोधात लढा सुरु केला. त्यावेळी या लढ्यात चार विद्यार्थ्यांना आपला जीव गमवावा लागला. मात्र या लढ्याच्या समरणार्थ दरवर्षी २१ फेब्रुवारीला आंतराष्ट्रीय भाषा दिन साजरा केला जातो.
मातृभाषेमुळे मुलांच्या आकलनात वाढ
मातृभाषेचा मुलांच्या आकलनावर आणि समजावर महत्त्वपूर्ण परिणाम होतो. मातृभाषेतील शिक्षण मुलांना अधिक सहजपणे आणि नैसर्गिकरीत्या नवीन माहिती आत्मसात करण्यास मदत करते. त्यामुळे त्यांच्या विचारशक्तीचा प्रभाव पडतो. मातृभाषेतील संवादामुळे मुलांचा आत्मविश्वासही वाढतो आणि ते जास्त प्रमाणात कल्पकतेचा उपयोग करू शकतात.
प्रत्येक दोन आठवड्याला जगातील एक स्थानिक भाषा लुप्त होत आहे असं संयुक्त राष्ट्राचा एक अहवाल सांगतोय. पण लक्षात घेण्यासारखी गोष्ट म्हणजे केवळ ती भाषाच लुप्त होत नाही तर त्यासोबत संपूर्ण संस्कृती आणि वारसा लुप्त होतोय. त्यामुळे आपल्या मुलांना लहानपणापासून स्वभाषेचे प्रशिक्षण देणे महत्वाचे आहे.