Jayant Patil: राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगलीय. अशातच जयंत पाटील यांनी विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांचं कौतुक केलं आहे. त्यांनी कौतुक करत मिश्कील टोलेबाजी देखील केली आहे. ‘विधानसभेचं रूप राहुल नार्वेकर यांनी बदललेलं आहे. तसेच त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाल्यामुळे, हे अधिवेशन माझ्यासाठी बरं जाईल’, असा टोला देखील त्यांनी लगावला आहे. त्यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे.
सांगलीच्या मिरज येथे ब्राह्मण समाजाच्या वतीने नूतन खासदार-आमदारांचा सत्कार पार पडला. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या हस्ते जयंत पाटील यांचा देखील सत्कार पार पडला. या कार्यक्रमात जयंत पाटील यांनी जोरदार टोलेबाजी केल्याचे पाहायला मिळाले. जयंत पाटील भाषणात म्हणाले की, पंधरा ते वीस वर्षांपूर्वीची विधानसभा आणि नार्वेकर साहेबांनी दुरुस्त केलेली विधानसभा ही बघण्यासारखी आहे. एखाद्याला उत्तम दृष्टी असली की असा बदल होऊ शकतो याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे नार्वेकर साहेबांची मागच्या काही वर्षाची कारकीर्द आहे. त्यामुळे त्यांच्या हस्ते माझा सत्कार झाल्याने येतं अधिवेशन माझ्यासाठी बरं जाईल अशी मिश्कील टोलेबाजी जयंत पाटील यांनी केली. यावर राहुल नार्वेकरांनी देखील माझे देखील बरं जाईल असं वाटतंय, असे मिश्किल प्रतिउत्तर दिले.
पुढे, याच कार्यक्रमात जयंत पाटील आणि गोपीचंद पडळकर यांनी एकमेकांवर टीकाटिप्पणी केल्याचे दिसून आले. जयंत पाटील म्हणाले की, अलीकडे वेगवेळ्या समाजाचा द्वेष करण्याची फॅशन सुरू झाली आहे. आपल्या समाजात आपलं नेतृत्व वाढत असेल तर दुसऱ्याला शिव्या देणं ही एक पद्धत सुरु झालीय. शिव्या देणाऱ्या त्या व्यक्तीला तो समाज डोक्यावर घेतो हे दुर्दैवानं आपण या देशात पाहतोय. दुसऱ्यांना शिव्या देऊन आपण मोठं होत नाही तर त्यासाठी आपली रेषा मोठी करावी लागते हे काही जणांच्या अजून लक्षात आलं नाही, असे म्हणत त्यांनी गोपीचंद पडळकर यांच्यावर निशाणा साधला. तर यावर गोपीचंद पडळकर म्हणाले की, महाराष्ट्रामध्ये प्रचंड जातीयवाद सुरू आहे. बोले तैसे चाले त्याची वंदावी पाऊले या म्हणीप्रमाणे सध्या होताना दिसत नाही. बोलणारे तसे बोलत नाहीत. लोका सांगे ब्रह्मज्ञान आपण मात्र कोरडे पाषाण या ऊक्तीप्रमाणे अनेक नेते सध्या महाराष्ट्रात मार्गदर्शन करतात. तसे मार्गदर्शन काही वेळापूर्वी या स्टेजवर आपण सर्वांनी ऐकलं असे म्हणत पडळकर यांनी जयंत पाटील यांना चिमटा काढला. केतकी चितळे जी भूमिका घेते त्या भूमिकेवर ती ठाम राहते . त्या केतकी चितळेचा आता जयंत पाटलांनी आदर्श घ्यावा. नाहीतर सहा महिन्यापूर्वी मुख्यमंत्री आणि आता दारात अशी भूमिका घेऊन राजकारणात चालत नाही असे म्हणत गोपीचंद पडळकर यांनी जयंत पाटील यांच्यावर नाव घेत टीका केली.
हे ही वाचा:
Raksha Khadse: केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीसोबत धक्कादायक प्रकार