बीडच्या शिरूरकासार येथील सतीश भोसले उर्फ खोक्या भाई याच्यावर गुन्हा दाखल होऊन देखील तो अद्याप फरार आहे. ढाकणे कुटुंबाच्या मारहाणीच्या निषेधार्थ आणि खोक्याला तात्काळ अटक करा, या मागणीसाठी आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली आहे. तसेच येथील पोलीस ठाण्यावर आक्रोश मोर्चा काढण्यात आला आहे. या मोर्चात शेकडो लोक सहभागी झाले आहेत. या मोर्चामध्ये ओबीसी नेते लक्ष्मण हाके, नवनाथ वाघमारे यांच्या सह अनेक जन सहभागी झाले आहेत. सकाळी ९ वाजता हा आक्रोश मोर्चा निघाला आहे. आरोपीला वाचवणाऱ्या भाजप आमदार सुरेश धस यांना सहआरोपी करा, अशी मागणी या मोर्चेकऱ्यांनी केली आहे. या मोर्चात एकूण सहा मागण्या करण्यात आल्या. दरम्यान, सतीश भोसले याने दिलीप ढाकणे याला बेदम मारहाण केल्याचे समोर आले आहे.
वाल्मिक कराडचे कारनामे समोर आल्यानंतर आता सतीश भोसले अर्थात खोक्या भाईची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. गुंडगिरी, मारहाणीच्या घटना समोर आल्यानंतर खोक्याच्या शिकारीची चर्चा रंगली होती. खोक्यावर कारवाई करावी यासह इतर मागणीसाठी आज शिरूर शहर बंदची हाक देण्यात आली होती. यावेळी शहरात जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला होता.
शिकारीच्या जाळ्यावरून खोक्याने दिलीप ढाकणे व त्यांचा मुलगा महेश ढाकणे यांना बेदम मारहाण केली होती. या अमानुष मारहाणीत दिलीप ढाकणे यांचे आठ दात तुटले आणि जबडा फ्रॅक्चर झाला. त्यांच्या मुलाच्या पायाला गंभीर दुखापत झाली. दिलीप ढाकणे यांच्या शेतात खोक्याने हरणांच्या शिकारीसाठी जाळे लावले होते. त्याला पीडितांनी विरोध केला होता. त्यावरून चिडलेल्या खोक्याने त्यांना बेदम मारहाण केली. या घटनेचा व्हिडीओ समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली. बीडमध्ये आणखी एक कराड तयार होतोय का, असा संतप्त सवाल उपस्थित होऊ लागला होता. त्यानंतर पोलिसांनी खोक्याविरोधात कारवाईस सुरुवात केली आहे.
तर, दुसरीकडे खोक्याविरोधात आज शिरुर बंदची हाक देत जनआक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चात ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्यासह विविध संघटनांचे पदाधिकारी सहभागी झाले होते. यावेळी शेकडोंच्या संख्येने लोक मोर्चात सहभागी झाले होते.
Follow Us