Maharashtra DCM Oath Ceremony: एकनाथ गंगुबाई संभाजी शिंदे यांनी राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद व गोपनीयतेची शपथ दिली. एकनाथ शिंदे यांनी नव्या सरकारमध्ये उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. हिंदुहृयसम्राट बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांना स्मरून एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. या शपथविधी सोहळ्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत इतर केंद्रीय मंत्री उपस्थित आहेत. तब्बल २२ राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी या सोहळ्याला हजेरी लावली होती.
यासोबतच, देवेंद्र फडणवीस यांनी सर्व दिग्गजांच्या उपस्थितीत मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. ते म्हणाले, “मी देवेंद्र सरिता गंगाधरराव फडणवीस ईश्वरसाक्ष शपथ घेतो की, कायद्याद्वारे स्थापित झाले आहे अशा भारताच्या संविधानाबद्दल मी खरी श्रद्धा व निष्ठा बाळगीन. मी भारताची सार्वभौमता व एकात्मता उन्नत राखीन. मी महाराष्ट्र राज्याचा मुख्यमंत्री म्हणून माझी कामे निष्ठापूर्वक व सदसत् विवेक बुद्धीने पार पाडेन, आणि संविधान व कायदा यानुसार सर्व तऱ्हेच्या लोकांना मी निर्भयपणे आणि निःपक्षपातीपणे तसेच कोणाच्याही विषयी नमत्वभाव व आकस ना बाळगता न्यायवागणूक देईन.” महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही आपल्या पदाचा शपथविधी सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत पार पडला.
महाराष्ट्राचे नवे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाला होता. महायुतीच्या नेत्यांनी राज्यपालांची भेट घेतल्यानंतर संयुक्त पत्रकार परिषद घेतली होती. या परिषदेत अजित पवारांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार असल्याचे जाहीर केले होते. तर मुख्यमंत्र्यांशिवाय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शपथ घेणार का? असा प्रश्न एकनाथ शिंदे यांना विचारण्यात आला होता. त्यावर तुम्हाला सर्व प्रश्नांची उत्तरे मिळतील असे सांगून शपथविधीबाबत कोणतीही स्पष्टता देण्यात आली नव्हती. मात्र, शपथविधीला अवघे काही तास शिल्लक असताना एकनाथ शिंदे यांनी हा तिढा सोडवला आणि उपमुख्यमंत्रीपदाचा स्वीकार केला. एकनाथ शिंदे यांनी अनेक दिवसांपासून राजकीय वर्तुळात सुरु असलेल्या चर्चांना अखेर आज पूर्णविराम दिला.
हे ही वाचा:
शपथविधीदिनी मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल; वाहतूक पोलिसांकडून परिपत्रक जाहीर
Raj Thackeray On Oath Ceremony: नव्या सरकारला शुभेच्छा देताना राज ठाकरे म्हणाले,” सरकार चुकतंय…”