दावोसमधील वर्ल्ड इकॉनॉमीक फोरमच्या भारताच्या पॅव्हेलियनमध्ये महाराष्ट्राचाच बोलबाला राहिला. यामुळे महाराष्ट्राला जगभरातील विविध उद्योग क्षेत्रातील दिग्गज कंपन्यासमवेत विक्रमी १५ लाख ७५ हजार कोटी रुपयांचे गुंतवणूकीचे सामंजस्य करार करता आले. यातून राज्यात १५ लाख ९८ हजार रोजगार निर्मिती होईल, असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला. तसेच दावोसमधील इकॉनॉमी फोरममध्ये सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या जनतेचेही आभार मानले. दावोस मध्ये गुंतवणूकीचे ५४ आणि धोरणात्मक सहकार्याचे ७ असे एकूण ६१ सामजंस्य करार केल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली.
महाराष्ट्र आता डेटा सेंटरचे कॅपिटल होईल. डेटा हे नव्या युगाचे ‘ऑईल’ आहे. त्यामुळे या क्षेत्राची वाढ वेगाने होईल, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले. स्वित्झर्लंडमधील दावोस येथून मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल २३ जानेवारीला पत्रकारांशी दृकश्राव्य प्रणालीच्या माध्यमातून संवाद साधला. उद्योग मंत्री उदय सामंत मुंबई येथून सहभागी झाले.
सुरवातीलाच मुख्यमंत्री फडणवीस यांनी हिंदुहृदयसम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जयंती निमित्त अभिवादन केले. तसेच दावोस मध्ये वर्ल्ड इकॉनॉमीक फोरममध्ये देशातील अन्य सहा राज्यांसमवेत सहभागी होण्याची संधी दिल्याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानले. दावोसमध्ये यावेळी भारताकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलल्याचा, त्यामध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वामुळे विश्वास निर्माण झाल्याचा बदल लक्षात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
‘कंट्री डायलॉग’ या सत्रात आंध्रप्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू आणि तेलंगणांचे मुख्यमंत्री रेवंथ रेड्डी यांच्या समवेत सहभाग घेतल्याचे सांगून फडणवीस म्हणाले की, यात आम्ही आपापल्या राज्यांची शक्तीस्थळांची, वेगवेगळ्या राज्यांच्या विकास संकल्पनांची, गुंतवणूकसाठीची संधी याबाबतची माहिती दिली. एक भारत म्हणून सहा राज्यांनी भूमिका मांडत देशात जास्तीत जास्त गुंतवणूक कशी खेचून आणता येईल यासाठी प्रयत्न केले. एका आवाजात एक भारत म्हणून भूमिका मांडली, असेही त्यांनी आवर्जून नमूद केले. ‘जल सुरक्षित भविष्यासाठी जागतिक सहकार्य’ विषयांमध्ये देश आणि राज्याची भूमिका मांडली. जलयुक्त शिवारसोबतच जलसंधारणाच्या काय उपाययोजना राज्यात केल्या जात आहेत याचे सादरीकरण करता आले. आपापल्या राज्याची ताकद आम्ही येथे दाखवून देऊ शकलो. देशात मोठी गुंतवणूक आकर्षित करण्यासोबतच भारत ‘अट्रॅक्टीव्ह इन्व्हेस्टमेंट डेस्टीनेशन’ असल्याचे जगाला पटवून देण्यात यश आल्याचेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, महाराष्ट्रासाठी गुंतवणूकीचे असे विक्रमी सामंजस्य करार झाले याचा आनंद आहे. यातून भारताची आणि पर्यायाने महाराष्ट्राची ताकद वाढते आहे, हे स्पष्ट झाले आहे. अशा प्रकारे देशात होणाऱ्या सामंजस्य करारांचे यश हे चाळीस टक्क्यांपर्यंत असते. पण हेच प्रमाण महाराष्ट्राच्याबाबतीत सुमारे ६५ टक्के आहे. गतवर्षी दावोस मध्ये तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या काळात चांगली सुरवात झाली होती. त्यावेळी झालेल्या करारांची ९५ टक्क्यांपर्यंत अमंलबजावणी झाली आहे. महाराष्ट्राच्या बाबतीत याही वर्षी विविध क्षेत्रात गुंतवणूक येत आहे. त्यातही एमएमआर हे मॅग्नेट समजले जाते. एमएमआरमध्ये सहा लाख कोटींची गुंतवणूक येत आहे. याशिवाय विदर्भ पाच लाख कोटी, उत्तर महाराष्ट्र ३० हजार कोटी तर मराठवाड्याचे मॅन्युफॅक्चरींग हब हे शक्तीस्थळ ठरू लागले आहे. ही सगळी गुंतवणूक थेट विदेशी गुंतवणूक, विदेशी संस्थात्मक गुंतवणूक असते. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्थाही विस्तारीत होते.
हे ही वाचा :