Maharashtra Election Result 2024: राज्यातील विधानसभा निवडणुकीची (Maharashtra Vidhansabha Election 2024) धामधूम अखेर संपली असून निकालदेखील स्पष्ट झाला आहे. राज्यात लोकसभेत आलेल्या अपयशानंतर महायुतीने (Mahayuti) जबरदस्त परफॉर्मन्स देत बहुमत मिळवले आहे. दुसरीकडे महाविकास आघाडीला (Mahavikas Aghadi) मात्र विरोधी पक्ष नेता निवडण्यासाठी पुरेसे संख्याबळदेखील मिळवता आलेले नाही. अश्यातच महाराष्ट्र काँग्रेसचे (Congress) प्रभारी रमेश चेन्निथला (Ramesh Chennithala) यांनी या निकालावरून आश्चर्य व्यक्त करत मोठे भाष्य केले आहे.
रमेश चेन्निथला यांनी निकाल जाहीर झाल्यानंतर माध्यमांशी संवाद साधला. ते यावेळी म्हणाले, “महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल जनतेच्या अपेक्षित भावनांच्या विरोधातील आहे. राज्यातील सर्वच स्तरातील प्रमुख लोक, काँग्रेस व मविआचे नेते, पदाधिकारी, तळागाळातील कार्यकर्ते, पत्रकार यांच्याशी संवाद साधला असता हा निकाल अपेक्षित नव्हता असाच सुर निघत आहे. एक्झिट पोल मध्येही भाजपा युती व महाविकास आघाडी यांच्यात काटें की टक्कर दिसली. परंतु आज आलेला निकाल हा अविश्वसनीय, अनाकलनीय व अस्विकार्य आहे.”
ते पुढे म्हणाले की, “लोकसभा निवडणुकीत काँग्रेस महाविकास आघाडीला जनतेने घवघवीत यश दिले आणि अवघ्या ५ महिन्यात एवढा बदल होईल असे वाटत नाही. विधानसभा निवडणुकीसाठी राज्यभर दौरे केले, लोकांशी संवाद साधला, पूर्ण तयारीनिशी निवडणुका लढल्या. राज्यात शेतकऱ्यांपुढे गंभीर समस्या आहेत, महागाई, बेरोजगारी, सरकारचा भ्रष्टाचार असे मुद्दे असताना केवळ लाडकी बहिण या मुद्द्यावरून एवढा मोठा निकाल कसा लागू शकतो, जनतेचाही या निकालावर विश्वास बसलेला नाही.”
“काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा अत्यंत कमी मताने विजया झाला तर आठ वेळा विजयी झालेले बाळासाहेब थोरात, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासह काँग्रेसच्या महत्वाच्या नेत्यांचा पराभव झाला आहे. या पराभवाची जबाबदारी आपण घेत आहोत असे सांगून जनतेच्या प्रश्नासाठी व लोकशाहीच्या बचावासाठी काँग्रेस पक्ष यापुढेही अधिक जोमाने काम करत राहिल,” असेही चेन्नीथला म्हणाले.
हे ही वाचा:
Aditya Thackeray यांचे निवडणुकीच्या निकालावर प्रश्नचिन्ह; म्हणाले, “महाराष्ट्राने मतदान केलंय की…”