Supriya Sule : बीडच्या मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्याप्रकरणी आज ६९ दिवस दिवस झाले तरी अद्यापही कृष्णा आंधळे हा सातवा आरोपी फरार आहे. त्याला अटक केली जात नसल्याने देशमुख कुटुंबीयांनी संताप व्यक्त केला आहे. एक आरोपी फरार तर एका आरोपीला व्हीआयपी ट्रीटमेंट, असा आरोप करण्यात येत आहे. तसंच, आमचा पोलिसांवर विश्वास राहिला नसून आम्हाला सुरक्षाही पुरवली नसल्याची तक्रार देशमुख कुटुंबीयांनी सुप्रिया सुळेंकडे केली आहे. सुप्रिया सुळेंनी आज देशमुख कुटुंबीयांची भेट घेतली असून त्यांना न्याय मिळवून देण्याचे आश्वासन दिले आहे.
माझा राम गेला, एकटा लक्ष्मण कुठवर धावणार? असा हंबरडा संतोष देशमुख यांच्या आईने फोडताच उपस्थित सर्वच जण गहिवरून गेले. राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे सुद्धा भावूक झाल्या. त्यांनी देशमुख यांच्या आईला आधार देण्याचा प्रयत्न केला. यावेळी ग्रामस्थ संतप्त झाले होते. आरोपीला देण्यात येणाऱ्या व्हीआयपी ट्रीटमेंट, एक आरोपी फरार, तर संथगतीने होणाऱ्या तपासावर गावकऱ्यांनी तोंडसुख घेतले. त्यांच्या भावनांना वाट मोकळी करुन दिली.माझं लेकरू कुठं शोधू? मारेकऱ्यांना लेकरं, आई-वडिल नाहीत का? एकटं माणूस पाहून मारलं, त्यांना काहीच वाटलं नाही का? असा सवाल संतोष देशमुख यांच्या आईने हंबरडा फोडला. त्यांच्या आक्रोशाने सर्वांचे मन भरून आले. ज्या दिवशी हत्या झाली, त्यादिवशी मी त्याची वाट पाहत होते. स्वयंपाक केलेला होता. त्याला फोन केला. पाचच रिंग वाजल्या आणि नंतर फोन बंद झाला, असे सांगतानाच त्या माऊलीचा कंठ दाटून आला, घळाघळा अश्रू आले.
माझ्या मुलाचा चेहरा सुद्धा पाहु दिला नाही, असे संतोष देशमुख यांच्या आई म्हणाल्या. पीएसआय राजेश पाटील हा खरा आरोपी असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला. आरोपींनी वॉचमनला मारहाण केली. अशोक मोहितेला आरोपींच्या मित्रांनी मारहाण केली,असे धनंजय देशमुख म्हणाले. तर पीएसआय पाटील यांच्यावर ॲट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांनी केली. देशमुख कुटुंबाला ६९ दिवसांपासून न्याय मिळाला नाही. माणुसकीच्या नात्याने सुप्रिया सुळे हा लढा लढणार आहे, असे सुप्रिया सुळे यांनी जाहीर केले. आईचं-बहिणीचं दुःख समजू शकते. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुसंस्कृत आहेत. त्यांच्याकडून लवकर न्यायाची अपेक्षा होती. त्यांनी वरतून एक मोठा सिग्नल द्यायला पाहिजे होते. हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांच्या संस्काराने चालेल, हे अपेक्षित आहे. मी न्यायासाठी मुख्यमंत्र्यांकडे पदर पसरवले, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. तसेच हा राजकारणच विषय नसून ह्याच्याकडे माणुसकीने पाहावे. व लवकरात लवकर आरोपींना पकडण्यात यावे असे सुप्रिया सुळे यांनी सांगितले.