भंडाऱ्यातील जवाहर नगर येथील आयुध निर्माण कंपनी येथे भीषण स्फोट झाला आहे. या भीषण अपघातात पाच जणांचा मृत्यू झाला असून अनेक जण मलब्या खाली दबून असल्याची माहिती आहे. हा स्फोट फॅक्टरीच्या आर. के. ब्रांच सेक्शनमध्ये झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या कंपनीत साडेदहा ते पावणे अकराच्या दरम्यान मोठा स्फोट झाला आहे. यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी दिली आहे. या दुर्घटनेत मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
ज्या इमारतीत स्फोट झाला ती इमारत पूर्णपणे उद्ध्वस्त झाल्याची माहिती समोर येत आहे. सध्या या कंपनीचे अधिकारी, पोलीस आणि अग्निशमन दलाचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. या इमारतीत स्फोट झाला तेव्हा 14 कामगार कार्यरत होते. कारखान्याच्या आर. के. सेक्शनमध्ये स्फोट झाला आहे. सध्या घटनास्थळी युद्धपातळीवर बचावकार्य सुरु करण्यात आले आहे. काही कामगारांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. हा स्फोट नेमका कशामुळे झाला? याचे कारण अद्याप समोर आलेले नाही.
काय म्हणाले विजय वडेट्टीवार?
भंडारा येथील दुर्घटनेची प्राथमिक माहिती माझ्याकडे आता आली आहे. मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. ही दुर्दैवी घटना आहे. सध्या पाच जणांचा मृत्यू झाल्याचे समजते आणि अनेक जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले..
याबाबत आमदार नरेंद्र भोंडेकर म्हणाले की, ही घटना अत्यंत गंभीर आहे. या दुर्घटनेत मोठी जीवितहानी होण्याची शक्यता आहे. आता या ठिकाणावरून कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्याचे काम सुरू आहे. स्फोट नेमका कशामुळे झाला? याबाबत अजून स्पष्टता आलेली नाही. कंपनीचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत. प्रशासनाचे देखील सर्व अधिकारी घटनास्थळी पोहोचले आहे. या परिसरात युद्ध पातळीवर बचावकार्य सुरू करण्यात आले असल्याचे त्यांनी म्हटले आहे.
हे ही वाचा :