१५ फेब्रुवारीपासून मनोज जरांगे यांनी राज्यव्यापी साखळी उपोषणाची घोषणा केली होती. पण राज्य सरकारने शिंदे समितीला मुदतवाढ देऊन ही समिती गॅझेटचा अभ्यास करणार असल्याचा अध्यादेश काढल्याने जरांगे पाटील यांनी १५ फेब्रुवारीपासून सुरू केलं जाणारं राज्यव्यापी साखळी उपोषण १५ दिवसांसाठी स्थगित केल आहे. या १५ दिवसांत म्हणजे फेब्रुवारी अखेर पर्यंत सरकारने उर्वरित २ मागण्या पूर्ण कराव्यात अन्यथा पुन्हा आंदोलन सुरू करणार असल्याचा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला आहे.
जोपर्यंत ठोस पुरावे मिळत नाही तोपर्यंत धनंजय मुंडेंवर कारवाई न करण्याची भूमिका अजित पवार यांनी घेतली आहे. त्यामुळे संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपींना सरकार सोडून देणार असल्याचा खळबळजनक दावा जरांगे पाटील यांनी केला आहे. देशमुख हत्या प्रकरणात पुराव्यांची छेडछाड करण्यात सरकारचा सहभाग आहे का? असा सवाल देखील त्यांनी केला आहे.
महादेव मुंडे यांच्या पत्नीने आंदोलन करण्याचा इशारा दिलाय. यावर बोलताना धनंजय मुंडेंची भावजय असताना अशी वेळ येऊ नये असं सांगत ही धनंजय मुंडेंसाठी शरमेची बाब आहे. मात्र, गरज पडली तर मी महादेव मुंडेंच्या पत्नीच्या पाठीशी उभं राहणार असल्याचे मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मुंबईत अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाचे मोदी आणि फडणवीस यांनी उद्घाटन केले. हिंदू आणि मराठ्यांच्या नावाखाली यांना सत्ता लागते. तुम्ही स्मारक बनवू शकले नाही, त्यामुळे तुमचा निषेध म्हणत जरांगे यांनी मोदी आणि फडणवीस यांचा निषेध नोंदवला आहे. राज्यातील भावनेशी जाणून बुजून तुम्ही खेळतायत. याचं भूमिपूजन फक्त नाटक आहे. तातडीने स्मारकाचं काम सुरु करा, शिवाजी पार्कला छत्रपती शिवाजी महाराज पार्क असं नामकरण करा, अशी मागणीही मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे.