काल ५ डिसेंबरला नव्या सरकारचा शपथविधी सोहळा पार पडला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) तर एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि अजित पवार (Ajit Pawar) यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर आता या शपथविधीवर मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी प्रतिक्रिया देत थेट सरकारला इशारा दिला आहे. मनोज जरांगे पाटील म्हणाले की, “त्यांनी कायद्याप्रमाणे शपथ घेतली, तिघांना शुभेच्छा देतो. आमच्याकडून तिघांचं अभिनंदन, पण आता नाटकबाजी बंद करायची आणि मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायला सुरुवात करायची, तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार झाल्यानंतर आम्ही सामूहिक आमरण उपोषणाची तारीख जाहीर करू”, असा इशारा त्यांनी दिला आहे.
देवेंद्र फडणवीस मराठा आरक्षणाचा प्रश्न मार्गी लावणार असतील तर चांगली गोष्ट आहे. लोकं तुम्हाला डोक्यावर घेऊन नाचतील, समाज तुमचं अभिनंदन करेल असं जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे. आम्ही आमच्या उपोषणावर ठाम आहोत, मंत्रिमंडळाचा विस्तार झाला की आम्ही आमच्या उपोषणाची तारीख जाहीर करू असंही मनोज जरांगे पाटील यांनी म्हटले आहे.
मनोज जरंगे पाटील यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावं यासाठी मोठा लढा उभारला. त्यांच्या आंदोलनानंतर सरकारने मराठा समाजासाठी स्वतंत्र्य आरक्षणाला मंजुरी दिली. मात्र, आम्हाला ओबीसीमधूनच आरक्षण पाहिजे या मागणीवर अद्यापही मनोज जरांगे पाटील ठाम आहेत, आता ते विधानसभा निवडणुकींनंतर पुन्हा एकदा आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत. त्यासाठी त्यांनी सरकारला इशाराही दिला आहे.
हे ही वाचा:
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.