मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी २५ जानेवारीपासून अंतरवाली सराटीत उपोषण सुरु केले आहे. उपोषणाच्या पाचव्या दिवशी त्यांची प्रकृती खालावली आहे. त्यामुळे मनोज जरांगे पाटील यांनी मंगळवारी रात्री सलाइनद्वारे उपचार घेतले. अंतरवाली सराटीत उपोषण स्थळीच मनोज जरांगे यांना सलाईन लावण्यात आले आहे.
मनोज जरांगे यांची आमरण उपोषणाच्या चौथ्या दिवशी प्रकृती खालावली होती. त्यामुळे डॉक्टरांकडून मध्यरात्री त्यांना सलाईन लावण्यात आली. त्यांनतर डॉक्टर आणि मराठा आंदोलनाच्या आग्रहानंतर मनोज जरांगे यांनी उपचारास होकार दिला. भाजप आमदार सुरेश धस मंगळवारी अंतरवाली सराठीमध्ये मनोज जरांगे पाटील यांना भेटण्यासाठी आले होते. त्यांनीं मनोज जरांगे यांच्या तब्येतीची विचारपूस केली. त्यांनी मनोज जरांगे यांनी सलाइनद्वारे उपचार घ्यावे, अशी विनंती केली होती. तर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मनोज जरांगे यांनी उपचार घ्यावा, असा आग्रह केल्याचे आमदार सुरेश धस यांनी सांगितले होते.
मनोज जरांगे पाटील यांचे अंतरवालीत उपोषण सुरु आहे. त्या उपोषणास पाठींबा देण्यासाठी मराठा समाज पुणे जिल्ह्याच्या वतीने बेमुदत आमरण आणि साखळी उपोषण २९ जानेवारीपासून जिल्ह्याधिकारी कार्यालयाच्या समोर करण्यात येत आहे. मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण स्थळी शासनाचा एकही प्रतिनिधी किंवा मंत्री भेट द्यायला आलेला नाही. त्यामुळे आता मराठा समाजाकडून पुणे शहरातील विविध ठिकाणी चक्का जाम आंदोलन करण्यात येईल, अशा इशारा अखंड मराठा समाजाच्या वतीने देण्यात आला आहे. तर धनंजय देशमुख यांनीही मनोज जरांगे पाटील यांना उपचार घेण्याची विनंती केली आहे.
हे ही वाचा :