जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांचा मनमर्जी कारभार व त्यांनी केलेली आर्थिक व्यवहार याची चौकशी करून, त्यांची जिल्हा बदली करावी या मागणीसाठी महाराष्ट्र राजपत्रित वैद्यकीय अधिकारी संघटना, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना तसेच विविध संघटनांनी सार्वजनिक आरोग्य मंत्री, जिल्ह्याचे पालकमंत्री, सार्वजनिक आरोग्य विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव यांना निवेदन दिली आहेत. या निवेदनाला आज २४ दिवस उलटले तरी देखील जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर कोणत्याच प्रकारची कारवाही झालेली नाही.
वैद्यकीय अधिकाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करणे, डॉक्टरांना अरेरावीच्या भाषेत बोलणे, प्रत्येक कामात आर्थिक व्यवहार करण्यास भाग पाडणे, या सारख्या तक्रारी त्यांच्या विरोधात असतांना देखील त्याच्या विरोधात कारवाई न होणे हे संशयास्पद असल्याचे दिसत आहे. जिल्ह्यात आधीच आरोग्याच्या समस्या भेडसावत असतांना अशा जिल्हा शल्यचिकित्सकामुळे जिल्ह्याची आरोग्य स्थिती खालावली आहे. त्यामुळे अशा अधिकाऱ्यांची बदली होणे गरजेचे आहे. जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. वर्षा लहाडे यांच्यावर ८ दिवसात कारवाई झाली नाही तर मेग्मो संघटनांसह इतर संघटना आंदोलनाचा पवित्रा घेणार आहेत.
१८ फेब्रुवारी ते २३ फेब्रुवारी पर्यंत काळ्या फीती लावून काम करणे, २४ फेब्रुवारी ते २ मार्चपर्यंत धरणे आंदोलन, ३ मार्च ते ९ मार्च पर्यंत अत्यावश्यक सेवा सोडून काम बंद आंदोलन करणे व तरीदेखील जिल्हा शल्यचिकित्सक यांच्यावर कारवाई झाली नाही तर १० मार्च पासून मेग्मो संघटना सह सर्व संघटना बेमुदत काम बंद आंदोलन करतील, असा इशारा यावेळी देण्यात आला. यावेळी मेग्मो संघटना, राज्य सरकारी मध्यवर्ती संघटना व महाराष्ट्र राज्य परिचारिका संघटना चे अधिकारी व सदस्य उपस्थित होते.