जागतिक व्याघ्रदिनी भारतातील वाघांची संख्या जाहीर झाली आणि त्यांच्या संख्यावाढीने व्याघ्रप्रेमींच्या आनंदाला भरते आले. मात्र, त्यांच्या आनंदात विरजण घालणारी वाघांच्या मृत्यूची आकडेवारी आता उजेडात आली आहे. २०२३ च्या पहिल्या दहा महिन्यांत देशात १५०हून अधिक वाघांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्रातही ४० पेक्षा अधिक वाघ मृत्युमुखी पडले आहेत.
सन २०१३ मध्ये पहिल्या दहा महिन्यांत ६८ वाघ मृत्युमुखी पडले होते. तर दहा वर्षांनंतर हा आकडा दुपटीपेक्षाही अधिक झाला आहे. गेल्या दहा महिन्यांत महाराष्ट्रात ४२ वाघांचा मृत्यू झाला आहे. राष्ट्रीय व्याघ्र संवर्धन प्राधिकरणाच्या संकेतस्थळावर मात्र देशात आणि महाराष्ट्रात अनुक्रमे १४८ आणि ३२ वाघांचा मृत्यू झाल्याची नोंद आहे.
जागतिक व्याघ्रदिनी जाहीर करण्यात आल्यानुसार वाघांच्या संख्येत महाराष्ट्र ४४४ वाघांसह चौथ्या क्रमांकावर आहे, पण मृत्यूचा विचार केला तर महाराष्ट्रात वाघांचे सर्वाधिक मृत्यू झाले आहेत. त्यांपैकी अनेक मृत वाघांची नोंद ‘नैसर्गिक मृत्यू’ अशी करण्यात आली आहे, पण या नैसर्गिक मृत्यूमागे अनैसर्गिक कारणे असू शकतात.
मानव-वन्यजीव संघर्षात वीजप्रवाह, विषप्रयोग यांसारखी कारणे आणि शिकारीचे धोके वाढत आहेत. त्यामुळे भारतातील वाघांच्या संख्येवर त्याचा परिणाम होण्याची भीती वन्यजीव अभ्यासकांच्या वर्तुळात व्यक्त केली जाते. त्याच वेळी व्याघ्र प्रकल्पाच्या बफर आणि कॉरिडॉरमध्ये पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांमुळे अनेक आव्हानांचा सामना करावा लागत आहे. वाघांच्या मृत्यूमागे हीदेखील कारणे आहेत.
राज्यात ४२ वाघ दगावले
२०२२ मध्ये महाराष्ट्रात ३२ वाघांचा मृत्यू झाला होता. यापैकी सहा वाघांचा मृत्यू वीजप्रवाहाने झाला आहे. २०२३ मध्ये ४२ वाघ मृत्युमुखी पडले. यात आठ वाघांचा मृत्यू वीजप्रवाहाने झाला. महाराष्ट्रातील जवळजवळ २० टक्के वाघांचा मृत्यू हा विजेच्या धक्क्याने झाला आहे. बरेचदा वाघांच्या मृत्यूचे गूढ उलगडत नाही. अशा वेळी तो नैसर्गिक मृत्यू ठरवला जातो, हे वास्तव आहे.
हे ही वाचा :
आता ‘iPhone’ ही होणार ‘मेड इन इंडिया’ (Made in India)
संजय राऊतांनी फडणवीसांनी डिवचलं, मी पुन्हा येईल चं आम्ही सध्या स्वागत करतो कारण…