नंदुरबार लोकसभेचे खासदार गोवाल पाडवी यांनी आज शिरपूर येथील नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केली.पिक विमा कंपनी शेतकऱ्यांकडे कानाडोळा करत असल्याचा गंभीर प्रकार उघड होत असून किचकट नियम व अटींमुळे पिक विमाचा मोबदला शेतकऱ्यांना मिळत नसून याप्रकरणी शासनाकडे पाठपुरावा करणार असल्याचे खासदार गोवाल पाडवी यांनी यावेळी सांगितले.
दि २७ डिसेंबर रोजी शिरपूर तालुक्यातील काही भागांमध्ये अवकाळी वादळीवाऱ्यासह पावसामुळे शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला होता. केळी, पपई, मका, हरभरा, ज्वारी, दादर, कापूस आदी पिकांचे मोठ्याप्रमाणात नुकसान झाले होते. याबाबत ज्या शेतकऱ्यांनी पिकविमा काढला होता. त्यांनी नुकसान झाल्याबाबत पिकविमा कंपनीला वेळेत कळवले. मात्र पिक विमा कंपनीकडून नुकसानीचा कुठलाही मोबदला न देता किचकट नियम व अटींमुळे शेतकऱ्यांना पिकविमा कंपनीचे कुठलेच सरक्षण मिळाले नाही.
खासदार गोवाल पाडवी हे शिरपूर दौऱ्यावर असतांना काही शेतकऱ्यांनी खासदार गोवाल पाडवी यांची भेट घेऊन दि २७ डिसेंबर रोजी शेतात झालेल्या नुकसानीचे व पिकविमा कंपनीच्या गलथान कारभाराबाबत तक्रारी निवेदन दिले. यावर खासदार गोवाल पाडवी यांनी तात्काळ नुकसान भागातील केळीच्या शेतात जाऊन पाहणी केली. अवकाळी पावसामुळे शेतकऱ्याचे संपूर्ण केळी भुईसपाट झाली असून पिकविमा कंपनीने किचकट नियम व अटी ठेवल्यामुळे शेतकऱ्यांना पिक विमा कंपनीचा काही फायदा होत नसून पिक विमा कंपनी अंगकाढूपणा करत असून या गंभीर प्रकाराबाबत शासनाकडे पाठपुरावा करून जातीने लक्ष देणार असल्याचे यावेळी खासदार गोवाल पाडवी यांनी शेतकऱ्यांना सांगितले. यासंदर्भात खासदारांनी कृषी अधिकारी यांना देखील फोनद्वारे संपर्क करत सुचना केल्या आहेत. खासदार गोवाल पाडवी यांनी तक्रार जाणून घेत थेट शेतीच्या बांधावर येऊन नुकसानग्रस्त शेतीची पाहणी केल्याने शेतकऱ्यांनी संभावना व्यक्त केले.