MSRTC: कर्नाटकमध्ये महाराष्ट्र महामंडळाच्या एसटी बसला काळं फासण्याची घटना घडली. बस चालकालाही काळ फासत त्याला मारहाण करण्यात आली होती. त्यामुळे राज्यात संताप व्यक्त केला जात आहे. याबाबत ठाकरे सेना देखील आक्रमक झाली असून राज्यातून कर्नाटकमध्ये होणारी एसटी बस वाहतूक थांबवण्यात आलीय. कोणतीच एसटी बस आता कर्नाटकडे जाणार नसल्याचे म्हटले जात आहे. कर्नाटकातील चित्रदुर्ग येथे महाराष्ट्राच्या एसटी बससह ड्रायव्हरला मारहाण करणे आणि काळं फासण्यात आल्याच्या घटनेवर आता कडक भूमिका घेतली जाण्याची शक्यता आहे. जे झालं ते चुकीचं झालं, तसे व्हायला नको होतं अशी प्रतिक्रिया राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik) यांनी दिली. यापुढे असं काही घडल्यास त्यावर कडक भूमिका घेण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. यापुढे कर्नाटकात बस सोडायच्या की नाही यासंदर्भात विचार केला जाईल,असं सरनाईक म्हणाले.
कर्नाटक नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी चालकाला मारहाण करत तोंडाला काळं फासलं. एसटी महामंडळाच्या चालकाला कन्नड येतं का? अशी विचारणा करत मारहाण करण्यात आली. एसटी महामंडळाच्या चालकाला मारहाण केल्याने त्याला तात्काळ रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं. चित्रदुर्ग जवळील ऐमंगळ टोल नाक्याजवळ हा प्रकार घडला. त्यानंतर त्याचे प्रतिसाद महाराष्ट्रात उमटल्याचं दिसून आलं. याआधी महाराष्ट्रात देखील मराठी बोलण्यावरून राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यकर्त्यांनी अनेकांना मारहाण केली आहे.
तर, या घटनेनंतर महाराष्ट्र एसटी बस ड्रायव्हर आणि कंडक्टर यांनी आता आम्हाला सुरक्षा दिली तरच आम्ही कर्नाटकात बस घेऊन जातो अशी भूमिका घेतली आहे. कन्नड संघटनाच्या मराठी द्वेषामुळे निष्कारण भाषिक द्वेष निर्माण होऊन निष्कारण जनतेला त्रास सहन करावा लागत आहे. शनिवारी सकाळपासून महाराष्ट्राच्या बस कर्नाटकात आलेल्या नसून त्यामुळे बेळगावहून महाराष्ट्रात जाणाऱ्या प्रवाशांची पंचाईत झाली आहे. सावंतवाडी, चंदगड, आजरा, गडहिंग्लज, मिरज, सांगली येथे जाण्यासाठी प्रवासी बस स्थानकावर थांबून आहेत. तर राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी कर्नाटकात बस सोडायच्या की नाही यासंदर्भात अजून कुठलेही प्रतिक्रिया दिलेली नाही.
Follow Us