मुंबईतल्या गोरेगाव परिसरातील आरे दुग्ध वसाहतीचा सर्वांगीण विकास करण्यासाठी मास्टर प्लॅन तयार करण्यात आला असून या योजनेमुळे लवकरच ‘आरे’चा संपूर्ण कायापालट झालेला दिसून येईल, असा विश्वास इतर मागास बहुजन कल्याण, दुग्धविकास आणि अपारंपरिक ऊर्जा मंत्री अतुल सावे यांनी व्यक्त केला.
मंत्री सावे यांनी आरे दुग्ध वसाहतीच्या परिसराची पाहणी करून विविध विकासकामांचा आढावा घेतला. या वेळी स्थानिक आमदार मुरजी पटेल, आमदार बाळा नर, आरेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीकांत शिपूरकर आणि इतर वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.
आरे दुग्ध वसाहतीकडे सध्या ११६२ एकर जमीन शिल्लक असून, त्यामध्ये दुग्धवसाहत, गोशाळा, तबेले, बगीचे, लॉन, पॅराग्रास आणि वृक्षारोपण करण्यात आले आहे. या परिसरातील नागरिकांसाठी सुसज्ज रुग्णालय उभारणी आणि रस्त्यांची दुरुस्ती करण्याच्या सूचनाही मंत्री सावे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी आरेच्या सर्वांगीण विकासासाठी नेमलेल्या सल्लागार कंपनीने मास्टर प्लॅनचे सादरीकरण केले. या मास्टर प्लॅननुसार आठ टप्प्यांमध्ये विकासाची प्रक्रिया राबवली जाणार असल्याचे सावे यांनी नंतर पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले.
यामध्ये प्रामुख्याने दुर्मिळ प्राणी, वन्यजीव व वनस्पतींचा शोध घेणे, अत्याधुनिक गोशाळा उभारणे, बोटींग सुविधा सुरू करणे, सुंदर बगीचा आणि कलादालन निर्माण करणे आदींचा समावेश असून हे करत असताना पर्यावरण संवर्धनाला प्राधान्य दिले जाईल. तसेच आरे परिसर पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्वाचा असल्याने त्याच्या विकासासाठी विविध बदल करण्याच्या सूचनाही मंत्री सावे यांनी संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या. यामुळे स्थानिक नागरिकांसह पर्यटकांनाही अधिक आकर्षित करता येईल, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
आढावा बैठकीनंतर मंत्री सावे यांनी आरे नर्सरी (गट क्र. २०), गणेश तलाव, रवींद्र आर्ट गॅलरी, आरे रुग्णालय, न्यूझीलंड हॉस्टेल, छोटा काश्मीर उद्यान आणि गट क्रमांक २ परिसर याठिकाणी प्रत्यक्ष भेट देऊन पाहणीही केली. या मास्टर प्लॅनच्या अंमलबजावणीमुळे आरे वसाहतीचे स्वरूप बदलणार असून पर्यावरणपूरक पद्धतीने विकास साधला जाणार आहे. त्यामुळे मुंबईकरांसाठी हे निसर्गरम्य पर्यटनस्थळ अधिक आकर्षक आणि सुसज्ज होणार असल्याचा दावा ही त्यांनी केला.
-किशोर आपटे
हे ही वाचा:
Bhiwandi Crime: जमिनीच्या वादातून जाळ्यात अडकून तरुणाची निघृण हत्या, प्रेमिकेसह पाच जणांना अटक