मंत्रालयात नव्याने फेस रीडिंग पद्धत लागू करत अभ्यागतांच्या प्रवेशावर मर्यादा आणण्याचा प्रयत्न जरी सुरू केला असला तरी मंत्रालयात येवून आंदोलनासाठी थेट संरक्षक जाळीवर उड्या मारण्याचे प्रकार काही थांबण्याचे नाव घेत नाही. कारण मंगळवारी मंत्रिमंडळाची बैठक झाल्यानंतर दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास पुण्यातील राठी रामनगर, वारजे माळवाडी येथील विजय परबती साष्टे नामक व्यक्तीने थेट मंत्रालयाच्या सातव्या मजल्यावरून दुसऱ्या मजल्यावरील संरक्षक जाळीवर उडी मारल्याने उपस्थित सुरक्षा यंत्रणेची धावपळ उडाली.अचानक झालेल्या प्रकाराने बघ्यांची एकच गर्दी उसळली. मात्र उपस्थित पोलिस अधिकारी व कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान दाखवून उडी मारणाऱ्याला वेळीच ताब्यात घेतल्याने पुढील अनर्थ टळला.
यासंदर्भात अधिक माहिती घेतली असता संबंधित व्यक्तीचे महसूल विभागात त्याच्या गावच्या जमिनीशी संबंधित कामाच्या निमित्ताने मंत्रालयात आला होता. त्याच्या वारजे माळवाडी गावातील ५४ गुंठे जागा पुण्यातीलच एका व्यक्तीने खोटी कागदपत्रे देऊन बळकावली होती.या अगोदरही सदर व्यक्ती वारंवार महसूल विभागात आपल्या कामानिमित्त मंत्रालयात येवून गेली होती. पण कोणीच त्याच्या फिर्यादीची दखल न घेतल्याने त्याने अखेर आजचा मार्ग पत्करल्याचे सांगण्यात आले.
विशेषतः अभ्यागतांना मंत्रालयात सोडतेवेळी त्यांची पूर्ण तपासणी होते. त्यातही त्यांच्याकडे काही आक्षेपार्ह वस्तू किंवा कागदपत्र आढळल्यास तपासणीवरील पोलिस ती काढून ठेवतात. मात्र ज्या विजय साष्टे या इसमाने उडी मारली त्यावेळी त्याने
सोबत काही पॅम्प्लेट देखील आणली होती, ज्यावर “इंकलाब जिंदाबाद” आणि “वारे महसूल खाते” असे मजकूर लिहिले होते, त्यामुळे आश्चर्य व्यक्त होताना दिसत आहे. मात्र पोलिसांनी त्याचा जबाब नोंदवत पुढील कारवाईसाठी त्याला मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले आणि चौकशीसाठी ताब्यात घेतले.
मंत्रालय मॉल बनल्याने असले प्रकार वाढीस…….
गेल्या सहा सात वर्षांपासून मंत्रालयाचा एकूणच आब पार धुळीस मिळाला आहे. कारण नवीन मंत्रालयाच्या त्रिमूर्ती पटांगणात दर महिन्याला कोणते ना प्रदर्शन भरवण्याची जणू स्पर्धाच सुरू झाली आहे. मग ते कधी विविध प्रकारच्या साड्यांचे, विविध महिला बचत गटांच्या वस्तू, अगदी खाद्यपदार्थ ते सर्वकाही. कधी हातमाग, तर कधी पुस्तकांचे प्रदर्शन.यातून होते काय ही प्रदर्शने पाहायला किंवा खरेदी करायला विशेषतः महिला अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने सहभागी होतात. त्यामुळे जो अभ्यागत आपल्या कामासाठी आला आहे त्याला ताटकळत बसावे लागते. मात्र अशा बेशिस्त अधिकारी व कर्मचाऱ्यांना कोणाचाच धाक नसल्याने मग अशा प्रकारची आंदोलने होतात. त्यामुळे खरतर विभागाच्या प्रमुखांनी यावर अधिक सख्त होत जर आळा घातला व ही असली प्रदर्शनांवर कटाक्षाने बंदी घातली तर काही प्रमाणात असल्या एकंदरीतच प्रकारांवर अंकुश लागू शकेल असे काही माजी सनदी अधिकाऱ्यांचे मत आहे.
मात्र आजच्या या घटनेनंतर मंत्रालयातील सुरक्षा व्यवस्था अधिक कडक केली जाण्याची शक्यता असून मंत्रालयात प्रवेश करणाऱ्या नागरिकांची अधिक काटेकोर तपासणी केली जाईल, अशी चर्चा सुरक्षा वर्तुळात सुरू झाली आहे.तसेच सरकारी कार्यालयांमधील विलंब टाळण्यासाठी आणि नागरिकांच्या तक्रारी वेळेत सोडवण्यासाठी अधिक उपाययोजना करणे गरजेचे असल्याचेही तज्ज्ञांचे मत आहे.
– किशोर आपटे
हे ही वाचा:
फोनवरील व्यक्तीने शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख… Indrajeet Sawant यांना धमकीचा फोन