मुंबई : बेकरी प्रॉडक्ट बनवन्यासाठी लाकडाच्या आणि कोळसा भट्टीचा वापर करण्यात येतो. मुंबईतील वायू प्रदूषण दिवसेंदिवस वाढत जात आहे. त्यामुळे प्रदूषणाला आळा घालण्यासाठी आवश्यक ती सर्व पाऊले मुंबई महापालिका उचलत आहे. त्याच अनुषंगाने न्यायालयाच्या निर्देशानुसार मुंबई महापालिकेने बेकरी प्रॉडक्ट बनवताना होणाऱ्या लाकडाच्या आणि कोळसा भट्टीच्या वापरावर बंदी घातली आहे. त्यामुळे बेकरी उद्योगातील वातावरण तापले आहे. या संदर्भात अनेक ठिकाणी बेकरी त्यासोबतच इराणी कॅफेला नोटीस पाठवून कारवाई करण्यात येत आहे. याच कारवाईला बेकरी असोसिएशनने विरोध दर्शवला असून इराणी कॅफे आणि जुन्या बेकरींना वारसा दर्जा द्यावा, अशी मागणी भाजपचे माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी केली आहे.
मुंबईत गेल्या काही वर्षांपासून हिवाळ्यात देखील प्रदूषण होऊ लागले आहे. दोन वर्षांपूर्वी मुंबईतील हवेचा स्तर दिल्लीपेक्षाही वाईट झाला होता. तेव्हा मुंबईतील वाढत्या प्रदूषणावर तोडगा काढण्यासाठी सात सदस्यांची समिती तयार करण्यात आली होती. त्या समितीने दिलेल्या अहवालात प्रदूषणासाठी कारणीभूत ठरणाऱ्या घटकांमध्ये इतर मुद्द्यांबरोबरच उपाहारगृहातील तंदूरचा मुद्दा पुढे आला होता. तंदूरमधील कोळशांमुळे मोठ्या प्रमाणावर राख उडते व प्रदूषण होते. तसेच बेकरीमध्येही अनेक ठिकाणी लाकूड जाळून त्याचा जाळ केला जातो. त्यामुळे उपाहारगृहे व बेकरी उद्योगातील या तंदूर आणि भट्ट्या स्वच्छ इंधनावर रूपांतरित करण्याचा विचार पुढे आला होता. मात्र, त्यानंतर प्रत्यक्षात कार्यवाही न झाल्याने उच्च न्यायालयाने पालिकेला फटकारले असून जुलैपर्यंतची मुदत दिली. त्यामुळे लाकडावर किंवा कोळशावर चालणाऱ्या बेकऱ्या व तंदूर भट्ट्या चालवणारी उपाहारगृहे व हॉटेल्स यांना कोळशाची भट्टी बंद करण्याबाबत पालिकेने नोटिसा पाठवायला सुरुवात केली आहे.
मात्र, यावर मुंबईतील वाढते प्रदूषण कमी करण्यासाठी बेकरीत लाकडी आणि कोळसा भट्टी वापरण्यास मुंबई (Mumbai) महापालिका क्षेत्रात बंदी घातल्याने ही बंदी मागे घेण्याची मागणी बेकरी मालक आणि भाजप माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मागणी केली आहे. यावर पर्याय निघाला नाही तर मुंबईत (BMC) वडापावसाठी लागणाऱ्या पावाचा पुरवठा विस्कळीत होण्याची शक्यता बेकरी असोसिएशनने वर्तवली आहे. मुंबईतील बेकरी आणि इराणी कॅफे यांना नियमातून वगळावे व पाककलेचा वारसा जपण्यासाठी वारसा दर्जा द्यावा, अशी मागणी माजी नगरसेवक मकरंद नार्वेकर यांनी मुख्यमंत्र्यांकडे पत्राद्वारे केली आहे. बीएमसीने या कोळसा आणि लाकडी भट्ट्यांऐवजी इलेक्ट्रिक किंवा गॅसवर चालणाऱ्या भट्ट्यांचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत.
Follow Us