मुंबई उपनगरातील भांडुप परिसरात असलेल्या ड्रीम्स मॉलमध्ये एका महिलेचा मृत्यूदेह आढळून आला आहे. हा मृयूदेह एका महिलेचा आहे. ड्रीम्स मॉलच्या बेसमेंटमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्यात मंगळवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास एका महिलेचा मृतदेह तरंगताना दिसून आला. या महिलेच्या अंगावर गुलाबी ड्रेस आणि पांढरी ओढणी होती. या महिलेची ओळख अद्याप स्पष्ट झालेली नाही आहे. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.
प्राथमिक माहितीनुसार, भांडुप पोलीस स्टेशन अंतर्गत ड्रीम्स मॉल बेसमेंट या ठिकाणी पाण्यात एक अनोळखी महिला वय वर्ष 30 ते 35 हिचा 09.40 चे सुमारास मृतदेह मिळून आला आहे. सदरचा मृतदेह मुलुंड जनरल हॉस्पिटल याठिकाणी भांडुप वन मोबाईलच्या मदतीने पाठवण्यात आला आहे. मृत महिलेच्या नातेवाईकांचा शोध घेणे चालू आहे.
भांडुप पश्चिमेला रेल्वे स्थानकाला लागून असलेल्या ड्रीम्स मॉल गेल्या अनेक वर्षांपासून जवळपास बंद पडलेल्या अवस्थेत आहे. या मॉलमध्ये मोजकीच दुकाने आणि कॉल सेंटर उरले होते. पावसाळ्यात या मॉलमध्ये चहुबाजूंनी पाणी शिरते. त्यामुळे बहुतांश व्यावसायिकांनी या मॉलमधून काढता पाय घेतला होता. त्यानंतर या मॉलमध्ये काही कंपन्यांची कार्यालये आणि मोजकी दुकाने उरली होती. त्यामुळे या मॉलमध्ये लोकांची फारशी ये-जा नव्हती. मध्यंतरी ड्रीम्स मॉलमध्ये असलेल्या एका रुग्णालयाला भीषण आग लागली होती. त्यामुळे येथील रुग्णांना इतरत्र हलवण्यात आले होते. तेव्हापासून ड्रीम्स मॉलची संपूर्ण रया गेली होती. अशात या मॉलमध्ये महिलेचा मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली होती. ही महिला नेमकी कोण होती, ती याठिकाणी कशासाठी आली होती, तिचा मृत्यू कसा झाला, असे अनेक प्रश्न यानिमित्ताने उपस्थित झाले आहेत. याबाबत आता पोलीस तपासातून काय माहिती समोर येणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
मॉल बंद असल्यामुळे काही तरुण-तरुणी बंद मॉलच्या आत जाऊन गैरफायदा घेतात. तसेच काही समाजकंटकही आत बसलेले असतात, असे स्थानिकांकडून सांगितले जाते. स्थानिकांनी अनेकदा ड्रीम्स मॉलमधील सुरक्षेचा मुद्दा उपस्थित केला होता. मात्र, स्थानिक प्रशासन आणि पोलिसांकडून त्याबाबत कोणतीही ठोस पावले उचलण्यात आली नव्हती.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत
Follow Us
टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .