बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री कायम कोणत्या ना कोणत्या जाहिरातीतून चर्चेत येत असतात. अशातच एक जाहिरात नेहमी चर्चेत आणि तिच्यावर अनेकदा प्रश्नचिन्हही उपस्थित केले जातात. पण आता या जाहिरातीमुळे तीन सुपरस्टार अभिनेत्यांच्या अजचणीमध्ये वाढ होताना दिसतेय. ती जाहिरात म्हणजे पान-मसाल्याची.
जाहिरात पडली महागात
शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना पण मसाल्याची जाहिरात करणे भरपूर महागात पडलं आहे. या तिघांविरोधात ग्राहक न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे. अलीकडेच, कोटा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने बॉलिवूड अभिनेते शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांच्याविरुद्ध कोटा ग्राहक विवाद निवारण आयोगाकडे तक्रार दाखल केली आहे. त्याने तक्रारीत म्हटलं आहे की, हे कलाकार केशरयुक्त पान मसाल्याची जाहिरात करून तरुणांची फसवणूक करतायत. त्यामुळे आता आयोगाने या तीन बॉलिवूड सेलिब्रिटी आणि उत्पादन तयार करणाऱ्या कंपनीविरुद्ध खटला दाखल केला आहे. तसेच या प्रकरणी 21 एप्रिलपर्यंत उत्तर मागितलं आहे.
कोटा येथील एका सामाजिक कार्यकर्त्याने जिल्हा ग्राहक वाद निवारण आयोगाकडे या सर्वांविरुद्ध तक्रार दाखल केली आहे आणि पान मसाल्याच्या जाहिरातीवर बंदी घालण्याची मागणी केली आहे. तक्रारदाराचे नाव इंद्रमोहन सिंग हनी असून त्यांनी याचिकेत म्हटलं आहे की, 1 मे 2004 पासून देशात तंबाखूजन्य पदार्थांच्या जाहिरातींवर बंदी घालण्यात आली होती. पण त्यानंतरही काही रुपयांसाठी या चित्रपट कलाकारांकडून दिशाभूल करणारा प्रचार केला जात आहे, ज्यामुळे तरुणवर्ग वेगळ्या मार्गाने जात आहेत.
याचिकाकर्त्यांनी खोट्या जाहिरातींवर तात्काळ बंदी घालावी अशी मागणी केली असून कंपनीला दंड ठोठावण्याची विनंतीही केली आहे. दंडाची रक्कम भारत सरकारच्या युवा कल्याण आणि क्रीडा मंत्रालयाच्या युवा कल्याण निधीत जमा करावी अशी मागणी तक्रारदाराने केली आहे. आयोह अध्यक्ष अनुराग गौतम आणि सदस्य वीरेंद्र सिंग रावत यांनी शाहरुख खान, अजय देवगण आणि टायगर श्रॉफ यांना विमल पान मसाल्याच्या निर्मात्यांना ग्राहक न्यायालयात हजर राहण्याची नोटीस बजावली आहे.