भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व पद्म पुरस्कारार्थींचे अभिनंदन केले आहे. यात माजी मुख्यमंत्री मनोहर जोशी, गायक पंकज उधास यांना मरणोत्तर पद्मभूषण पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या दोहोंचा त्यांच्या क्षेत्रातील कार्याचा बहुमान झाल्याची प्रतिक्रिया व्यक्त करून, त्यांना विनम्र अभिवादन केले आहे.
सुलेखनकार अच्युत पालव, एसबीआयच्या माजी अध्यक्ष अरुंधती भट्टाचार्य, ज्येष्ठ अभिनेते आणि महाराष्ट्रभूषण अशोक सराफ, ज्येष्ठ गायिका अश्विनी भिडे- देशपांडे, बारीपाड्याचे वनसंरक्षक चैतराम पवार, ज्येष्ठ गायिका जसपींदर नरूला, अरण्यॠषी मारुती चितमपल्ली, ज्येष्ठ बासरीवादक रोणू तथा राणेंद्र भानू मजुमदार, कृषीतज्ज्ञ सुभाष शर्मा, चित्रकार वासुदेव कामत, ज्येष्ठ होमिओपॅथी तज्ञ डॉ विलास डांगरे या सर्वांना पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीस यांनी आनंद व्यक्त केला आहे. या सर्वांनी आपापल्या कर्तृत्वाने, त्या त्या क्षेत्राचा गौरव वृध्दिंगत केला आहे. या सर्व मान्यवरांनी व्रतस्थ राहून कार्य केले आहे. यामुळे या क्षेत्रांच्या लौकिकात भर घातली गेली आहे. ही बाब प्रेरणादायी असल्याचे नमूद करून मुख्यमंत्री श्री. फडणवीस या सर्वांचे अभिनंदन केले आहे. त्यांच्या पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहे. अरण्यॠषी चितमपल्ली आणि डॉ. विलास डांगरे यांची कर्मभूमी नागपूर आणि विशेषत: विदर्भ परिसर राहिली आहे. या दोहोंचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पद्म पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल अभिनंदन केले आहे.
सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत हाच महाराष्ट्राचा ध्यास
सर्वांग सुंदर, सर्वोत्तम भारत घडविणे हा महाराष्ट्राचा ध्यास आहे. त्यासाठी निर्धार करूया, असे आवाहन करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील नागरिकांना प्रजासत्ताक दिनाच्या पूर्वसंध्येला शुभेच्छा दिल्या आहेत.
मुख्यमंत्री संदेशात म्हणतात, ‘महाराष्ट्र हे भारताचे ‘पॉवर हाऊस’ आहे. आगामी काळात ‘डेटा सेंटर’चे ‘कॅपिटल’ होणार आहे. आपले एमएमआर क्षेत्र जागतिक ‘ग्रोथ सेंटर’ होणार आहे. जागतिक गुंतवणूकदार आणि उद्योग क्षेत्रासाठी महाराष्ट्र ‘मॅग्नेट’ आहे. या सगळ्या शक्तिस्थळांमुळे महाराष्ट्राचे भारतीय अर्थव्यवस्था शक्तिशाली करण्यात अनन्य साधारण योगदान राहणार आहे. त्यामुळे महाराष्ट्र आता थांबणार नाही. शेती – सिंचन, शिक्षण, आरोग्य, उद्योग- ऊर्जा यांसह पायाभूत सुविधा क्षेत्रांत महाराष्ट्राने आतापर्यंत नेत्रदिपक कामगिरी केली आहे. सामाजिक न्यायाच्या बाबतीत ही महाराष्ट्राने अव्वल स्थान राखले आहे. पर्यावरण आणि वातावरणीय बदलात समतोल राखण्याचे भान- संवेदना जतन केली आहे. महाराष्ट्राचा हाच लौकीक आपल्याला वाढवायचा आहे. त्यासाठी एकजूट करायची आहे.आपले भारतीय प्रजासत्ताक आणखी बलशाली करायचे आहे. त्यासाठी सर्व भेद बाजूला ठेवून, परस्पर स्नेह, सौहार्द वाढवूया. सर्वश्रेष्ठ, सर्वांग सुंदर आणि सर्वोत्तम भारत घडविण्याचा संकल्प करूया. आपल्या पुर्वसुरींना दिलेला राष्ट्रप्रेमाचा वारसा पुढच्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा निर्धार करूया असे आवाहन करून, मुख्यमंत्री फडणवीस यांनी राज्यातील जनतेला प्रजासत्ताक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता