Republic Day 2025: भारतीय प्रजासत्ताकाच्या ७६ व्या वर्धापन दिनानिमित्त ठाणे शहरातील साकेत पोलीस मैदान येथे उपस्थित राहून पालकमंत्री म्हणून एकनाथ शिंदे यांनी राष्ट्रध्वज वंदन केले तसेच सर्वांना शुभेच्छा दिल्या. यावेळी पोलिसांनी दिलेली मानवंदना स्वीकारून प्रजासत्ताक दिनानिमित्त करण्यात आलेले संचलन एकनाथ शिंदे यांनी पाहिले. तसेच या सोहळ्याला उपस्थित असलेले आजी-माजी पोलीस अधिकारी, पोलीस कुटूंबीय आणि शहीद पोलिसांच्या कुटूंबाची एकनाथ शिंदे यांनी भेट घेऊन त्यांना आधार दिला. तसेच यावेळी वर्षभरात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना एकनाथ शिंदे यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. प्रजासत्ताक दिनानिमित्त महाराष्ट्राच्या सर्व जनतेला आणि ठाणेकरांना मनापासून शुभेच्छा. ज्यांच्यामुळे स्वातंत्र्य मिळालं त्या सर्व स्वातंत्र्यवीरांना मी विनम्र अभिवादन. या महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्राचा जो गतिमान विकास होतोय तो यापुढे अधिक वेगाने होईल आणि या राज्यातील सर्वसामान्य लोकांच्या जीवनामध्ये चांगले दिवस येतील, अशा शुभेच्छा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या.
लाडकी बहीण, लाडका भाऊ, लाडके शेतकरी, लाडके जेष्ठ, लाडके युवा या सर्वांसाठीच आम्ही अडीच वर्षात चांगलं काम केलं म्हणून जनतेने देखील शिक्कामोर्तब केलं, कामाची देखील पोचपावती दिली आहे. आता देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली या राज्याचा अधिक वेगाने विकास होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला.
दावोसमध्ये नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योग मंत्री उदय सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली १५ लाख कोटींचे करारनामे झाले. ही महाराष्ट्रासाठी अतिशय भूषणावह बाब आहे. महाराष्ट्र इंडस्ट्री फ्रेंड लिस्टेड झाली आहे. महाराष्ट्राकडे उद्योजक आकर्षित होत आहेत, हेच यावरून सिद्ध झालं आहे. त्यामुळे महाराष्ट्राचा वेगवान विकास होईल. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भक्कम साथ, त्यांचं पाठबळ या राज्याला विकासासाठी मिळतंय म्हणून हे डबल इंजिन सरकार आहे ते अधिक वेगाने पुढच्या काळात धावेल, असा आशावाद उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी बोलून दाखवला.
हे ही वाचा :
प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे कसे ठरवले जातात आणि कोणत्या देशाला ही संधी सर्वाधिक वेळा मिळाली?
ध्वजारोहण करताच वाशिमचे पालकमंत्री हसन मुश्रीफ तत्काळ कोल्हापूरला रवाना