मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आज धर्मवीर, स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराज मुंबई किनारी रस्ता (कोस्टल रोड) व वरळी-वांद्रे सागरी सेतू (सी-लिंक) यांना जोडणार्या उत्तर वाहिनी पुलाचे लोकार्पण पार पडले. या किनारी रस्त्याच्या मुख्य उत्तर वाहिनी मार्गिकेसह, तीन इतर मार्गिकांचेही उदघाटन आज मुख्यमंत्री फडणवीस यांनी केले. कोस्टल रोडमुळे मुंबईकरांच्या वेळेची मोठी बचत होणार असून प्रदूषणापासूनही मुक्ती मिळणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले. कोस्टल रोड प्रकल्पाचे ९४ % काम झाले असून फेब्रुवारी महिन्यात प्रभादेवी कनेक्टरचेही काम पूर्ण होऊन हा संपूर्ण रस्ता मुंबईकरांसाठी खुला होईल, असेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले. तसेच या रस्त्याच्या बांधकामात सहभागी मुंबई महानगरपालिकेचे सर्व अधिकारी, अभियंते, कर्मचारी तसेच या प्रकल्पाचे कंत्राटदार व सर्व बांधकाम कर्मचारी यांचेही अभिनंदन मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी केले.
लोकार्पण झालेल्या मार्गिका
- मरीन ड्राईव्हकडून सागरी सेतूकडे जाणारा उत्तर वाहिनी पूल
- मरीन ड्राईव्हकडून प्रभादेवीकडे जाण्यासाठीची आंतरमार्गिका
- बिंदूमाधव ठाकरे चौकातून सागरी सेतूला जोडणारी आंतरमार्गिका
- वांद्रेच्या दिशेने जाणारी आंतरमार्गिका
प्रकल्पाची ठळक वैशिष्ट्ये
- रस्त्याची लांबी – १०.५८ किमी
- मार्गिका (४+४) बोगद्यांमध्ये (३+३)
- पुलांची एकूण लांबी – २.१९ किमी
- बोगदे- दुहेरी बोगद्यांची लांबी प्रत्येकी २.०७२ किमी, अंतर्गत व्यास- ११ मीटर
- आंतरमार्गिका – ३, एकूण लांबी – १५.६६ किमी
- एकूण भरावक्षेत्र – १११ हेक्टर
- नवीन विहारक्षेत्र – ७.५ किमी
- हरितक्षेत्र – ७० हेक्टर
- भूमिगत वाहनतळांची संख्या – ४,
- एकूण वाहनक्षमता – १८०० चारचाकी
- प्रकल्पाचा एकूण खर्च १३ हजार ९८३ कोटी
- भारतात प्रथमच रस्ते वाहतूक बोगद्यांमध्ये सकार्डो वायूजीवन प्रणालीचा वापर
- एकाच प्रकल्पामध्ये पुन:प्रापण करून रस्ता, पूल, उन्नत मार्ग, उतरण मार्ग अच्छादित बोगदा, समुद्रक्षेत्र तसेच टेकडीखालून बोगदा, आरक्षणाची निर्मिती.
- भारतामध्ये प्रथमच एकलस्तंभ (मोनोपाईल) उभारून पुलाची बांधणी.
- भारतात सर्वप्रथम समुद्रकिनारी भरती-ओहोटी क्षेत्राखालून बोगद्याचे खनन व बांधकाम.
- बोगदा खनन संयंत्राच्या साहाय्याने भारतातील सर्वात मोठ्या व्यास (१२.१९ मीटर) असलेल्या बोगद्याची निर्मिती.
- या प्रकल्पात प्रवाळांच्या वसाहतींचे स्थलांतर ९० टक्के यशस्वी.
प्रकल्पाचे फायदे
वेळेची सुमारे ७० टक्के बचत, तर इंधनात ३४ टक्के बचत. याचे फलित म्हणून परकीय चलनाचीही बचत. ध्वनी प्रदूषण व वायुप्रदूषणात घट होण्यास मदत. ७० हेक्टर हरित क्षेत्राची निर्मिती. मुंबईकरांचे जीवनमान उंचावण्यासाठी हरितक्षेत्रात सायकल ट्रॅक, सार्वजनिक उद्याने, जॉगिंग ट्रॅक, खुले प्रेक्षागृह साकारण्यात येत आहेत. या प्रकल्पामुळे मुंबईकरांना नवीन विहारक्षेत्र लाभणार. या प्रकल्पात सागरी संरक्षण भिंतीची उभारणी. यामुळे किनाऱ्याची धूप होणार नाही आणि समुद्राच्या उंच लाटांपासून प्रकल्पाचे संरक्षण होईल.
हे ही वाचा :
एस. टी च्या टप्पा वाहतूक सेवेची १४.९५ टक्के भाडेवाढ करण्यास मान्यता