मुंबईत पश्चिम उपनगरातील प्रवाशांच्या सोयीसाठी मेट्रो-२ अ आणि मेट्रो-७ ची सेवा रात्री उशीरापर्यंत चालविण्याचा निर्णय एमएमआरडीए प्रशासनाने घेतला आहे. दिवाळीनिमित्त मुंबईकरांना रात्री उशीरापर्यंत मेट्रोने प्रवास करायला मिळणार आहे. एमएमआरडीएचे अध्यक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेल्या आदेशानुसार मेट्रो प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री मंगलप्रभात लोढा यांनी एमएमआरडीएच्या महानगर आयुक्तांना पत्र लिहून मेट्रोची सेवा रात्री उशीरापर्यंत चालविण्याची मागणी केली होती. त्यामुळे आता केवळ सणापुरताच नव्हे तर येत्या शनिवार ११ नोव्हेंबरपासून मेट्रोच्या वेळेत कायम स्वरुपी वाढ करण्यात आली आहे, मेट्रोची सेवा आता रात्री १०.३० ऐवजी रात्री ११ वाजेपर्यंत सुरु राहणार आहे.
मेट्रो मार्ग-२ अ आणि मेट्रो-७ ची सुविधा सुरु झाल्यापासून पश्चिम उपनगरातील प्रवाशांची वाहतूक कोंडी आणि प्रदुषणातून सुटका झाली आहे. मुंबईतील पहिली मेट्रो घाटकोपर ते वर्सोवा मुंबई मेट्रो वनशी कनेक्शन झाल्याने दोन्ही मेट्रोच्या प्रवासी संख्येत वाढ झाली आहे. नवरात्री महोत्सवात मुंबईकरांच्या सोयीसाठी मेट्रो- मार्ग-२ अ आणि मेट्रो-७ रात्री उशीरापर्यंत चालवून दिलासा देण्यात आला होता. आता दिवाळीतही मेट्रोची सेवा रात्री १०.३० ऐवजी रात्री ११ वाजेपर्यंत चालवून प्रवाशांना दिलासा देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई मेट्रो मार्ग-२ अ च्या अंधेरी पश्चिम स्थानकावरून आणि मेट्रो-७ च्या गुंदवली स्थानकावरून शेवटची मेट्रो आता १०.३० ऐवजी रात्री ११ वाजता सुटणार आहे. सध्या मेट्रो मार्ग-२ अ आणि ७ वर गुंदवली ते अंधेरी पश्चिम दरम्यान सोमवार-शुक्रवार सकाळी ५.५५ ते रात्री १०.३० या कालावधीत सुमारे मेट्रोच्या २५३ फेऱ्या या साडे सात ते साडे दहा मिनिटांच्या अंतराने चालविण्यात येतात. आता या स्थानकांदरम्यान सकाळी ५.५५ ते रात्री ११ दरम्यान मेट्रोच्या २५७ फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. तसेच, रात्री १० वाजल्यानंतर दहिसर पश्चिम ते गुंदवलीपर्यंत दोन अतिरिक्त मेट्रोच्या फेऱ्या तर डहाणूकरवाडी ते अंधेरी पश्चिम दरम्यान दोन अतिरिक्त मेट्रो फेऱ्या चालविण्यात येणार आहेत. ‘मेट्रो मार्ग २ अ आणि ७ वर आत्तापर्यंत सुमारे सहा कोटी नागरिकांनी प्रवास केला आहे. तर जवळपास १.६ लाख मुंबईकरांनी मेट्रो वन कार्ड खरेदी केले आहे.
हे ही वाचा :
दिवाळीत तयार झाल्यानंतर फोटोशूटसाठी कसे फोटो काढायचे, तर करा ‘या’ सहा टिप्स
आजचे राशिभविष्य,१० नोव्हेंबर २०२३;नशिबावर हवाला ठेवून न राहता…