मुंबई महापालिकेच्या (Mumbai Municipal Corporation) जी उत्तर विभागाकडून धारावीतील (Dharavi) रस्त्यांची साफसफाई करण्यासाठी ‘स्पेशल क्लिनिंग ड्राईव्ह’ (Special Cleaning Drive) राबवण्यात आले. धारावीतून जाणारे आठ मुख्य रस्ते महिनाभरात स्वच्छ करण्यात आले. सुमारे ६०५ मेट्रिक टनहून अधिक कचरा उचलून रस्ते चकाचक करण्यात आले आहेत. महत्त्वाचे म्हणजे या मोहिमेसाठी विविध विभाग एकत्र आले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी सुशोभिकरणासह स्वच्छ मुंबईचा नारा दिला आहे. याअंतर्गत धारावीतील रस्त्यांच्या स्वच्छतेचे निर्देश ही त्यांनी दिले होते. त्या अनुषंगाने धारावीतील मुख्य रस्त्यांच्या स्वच्छतेसाठी विशेष नियोजन करण्यात आले. जी उत्तर विभाग कार्यालय, घनकचरा व्यवस्थापन विभाग, अतिक्रमण निर्मूलन विभाग व पोलिसांच्या संयुक्त विद्यामाने ही मोहीम राबवण्यात आली होती. हे रस्ते स्वच्छता अभियान साधारणतः महिनाभर सुरू होते.
दरम्यान रस्त्यांवर पाणी व कचरा साचू नये, असे निर्देश जी उत्तर विभागाचे सहाय्यक आयुक्त प्रशांत सपकाळे (Prashant Sapkale) यांनी दिले होते. त्यानुसार ही मोहीम आखण्यात आल्याची माहिती जी उत्तर विभाग, घनकचरा व्यवस्थापन विभागातील सहाय्यक अभियंता अमोल गिते (Amol Gite) यांनी दिली. या दरम्यान रस्त्यावरील कचरा, राडारोडा, प्लास्टिक, फर्निचरचा कचरा उचलण्यात आला. यासाठी जेसीबी, डंपर, अाधुनिक मशिनरी वापरण्यात आली. रस्त्यावर पार्क केलेली वाहने या स्वच्छता मोहिमेतील मोठा अडथळा होता. त्यातील काही वाहने हटवून त्याखालील कचरा साफ करण्यात आला, असेही अमोल गिते यांनी सांगितले. या मोहिमेमुळे धारावीचा कायापालट झाल्याची प्रतिक्रिया स्थानिकांनी दिली.
धारावीतून एलबीएस रोड, संत रोहिदास रोड, ९० फिट रोड, ६० फिट रोड, टी. एच. कटारिया रोड, सायन-माहिम पूल यासह आठ महत्त्वाचे मोठे रस्ते जातात. हे आठही रस्ते चकाचक करण्यात आले. मात्र हे करत असताना अवैध पार्कींग, बेवारस वाहने हटवण्याचे मोठे आव्हान होते. त्याशिवाय या मोहिमेला लोकांनी विरोध केल्याने अडचणी वाढल्या होत्या. लोकांची समजूत काढून ही मोहीम फत्ते करण्यात आली असे सहाय्यक अभियंता अमोल गिते यांनी सांगितले. विविध विभागांच्या सहाय्याने स्वच्छता मोहीम राबवून हे अभियान पूर्ण करण्यात आले. यामध्ये सुमारे ५० अधिकारी, ५०० पेक्षा अधिक कर्मचारी सहभागी झाले होते. याशिवाय पेस्ट कंट्रोल विभाग, स्वच्छ मुंबई प्रबोधन अभियान स्वयंसेवक व इतर मजूर यांनीही आपला हातभार लावला. या साफसफाईमध्ये राडारोडा आणि नालेसफाईतून निघालेली माती मोठ्या रस्त्यांच्या कडेला टाकण्यात आल्याचे आढळले. मात्र हद्दीचा किंवा विभागाचा विचार न करता सर्व कचरा उचलण्यात आला, अशी माहिती सहाय्यक अभियंता अमोल गिते यांनी दिली.
हे ही वाचा:
पुणेकरांना आता दहीहंडी उत्सव रात्री १० वाजेपर्यंतच साजरा करता येणार…
Janmashtami 2023, श्रीकृष्णाची भुमिका साकारुन ‘हे’ कलाकार झाले लोकप्रिय…