spot_img
Sunday, February 9, 2025

Latest Posts

J.J.Hospital च्या वॉर्डचे नूतनीकरण करण्यासाठी आवश्यक निधी उपलब्ध केला जाणार- Hasan Mushrif

शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णाला रुग्णालयात आपुलकीची वागणूक व सेवा मिळावी.

ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयात वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते ११ कोटी ७४ लाख किमतींच्या कामांचे उद्घाटन आणि 205 कोटी 24 लाख रुपये किमतीच्या कामांचे ई – भूमिपूजन करण्यात आले. यामध्ये ग्रँट शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर ज. जी. समूह रुग्णालयात ईएनटी विभाग, औषधवैद्यकशास्त्र, अस्थिव्यंगोपचार कक्ष, फिजियोलॉजी लेक्चर हॉलचे उद्घाटन आणि महाविद्यालयात नव्याने बांधण्यात येणाऱ्या व नूतनीकरण करण्यात येणाऱ्या इमारतीच्या कामांचा समावेश आहे.सर ज.जी रुग्णालयाचे राज्यात मोठे नाव आहे. या रुग्णालयात हृदय, किडनी व यकृत (लिव्हर) प्रत्यारोपण शस्त्रक्रिया व्हाव्यात, यासाठी आवश्यक साधने व उपकरणे उपलब्ध करुन दिली जातील. तसेच सर ज. जी. समूह रुग्णालयातील सर्वच वॉर्डचे नूतनीकरण करण्यासाठीही आवश्यक निधी उपलब्ध करून दिला जाईल, असे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी सांगितले.

 205 कोटी 24 लाख रुपये किमतीच्या कामांचे ई – भूमिपूजन

वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ म्हणाले, राज्यातील वैद्यकीय महाविद्यालयांमध्ये आवश्यक यंत्रसामग्री व सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. रुग्णालयात येणाऱ्या सामान्य माणसाला उत्तम प्रकारचे उपचार मिळावेत. यासाठी वैद्यकीय महाविद्यालये व रुग्णालयातील डॉक्टर्स, परिचारिका यासह सर्वच घटकांनी शासनाच्या आरोग्य योजनांचे दूत म्हणून आपली सेवा बजावावी, असे आवाहनही त्यांनी केले. मुश्रीफ म्हणाले, शासकीय रुग्णालयात उपचार घेण्यासाठी येणाऱ्या रुग्णाला रुग्णालयात आपुलकीची वागणूक व सेवा मिळावी. राज्यात सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल करण्याबाबत शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. सर्व जिल्ह्यात अशी रुग्णालये उभारण्यात येणार असून या सुविधांमुळे जटिल आजारांवर अधिक प्रभावी उपचार होऊ शकतील. नागपूर येथील ९ शासकीय महाविद्यालयांमध्ये पीपीपी तत्त्वावर एमआरआय, सिटीस्कॅन सेवा सुरू करण्यात येणार आहेत. वैद्यकीय महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनाही सुविधा उपलब्ध करून दिल्या जातील. याठिकाणी सुरू असलेल्या सुपर स्पेशलिटी हॉस्पिटलचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही मंत्री मुश्रीफ यांनी अधिकाऱ्यांना दिल्या.

अवयवदान चळवळीमध्ये जनजागृती करणे महत्त्वाचे असून मेंदू मृत ( Brain Dead) झालेल्या रुग्णाच्या नातेवाईकांना अवयवदानाचे महत्त्व पटवून द्यावे, असेही मुश्रीफ म्हणाले. आमदार मनीषा कायंदे, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, आयुक्त राजीव निवतकर, संचालक डॉ. अजय चंदनवाले यांनी मनोगत व्यक्त केले. अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे यांनी प्रास्ताविक केले. वैद्यकीय अधीक्षक डॉ. संजय सुरासे यांनी आभार मानले. या कार्यक्रमात अवयवदान कार्यक्रम यशस्वीरित्या आयोजित केल्याबद्दल डॉ. व्हर्नन वेल्हो, एका आठवड्यात दोन मूत्र प्रत्यारोपण यशस्वीपणे केल्याबद्धल यूरोलॉजी विभागाचे प्रमुख डॉ. अमोल कांबळे, नेफ्रोलॉजी विभागाच्या प्रमुख डॉ. गीता सेठ, सीव्हीटीएस विभाग प्रमुख डॉ. आशिष भिवापूरकर यांच्यासह डॉ. गजानन चव्हाण, डॉ.संजय सुरासे, डॉ.अरुण राठोड, डॉ. पूनम जैस्वाल, डॉ. चित्रा सेल्वराज, सुनील पाटील, राजेंद्र पुजारी, योजना बेलदार, नितीन नवले, सखाराम धुरी, सुरेंद्र शिंदे यांचा यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास आमदार मनीषा कायंदे, प्रधान सचिव दिनेश वाघमारे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे आयुक्त राजीव नीवतकर, अधिष्ठाता डॉ. पल्लवी सापळे, वैद्यकीय शिक्षण व संशोधनचे संचालक डॉ. अजय चंदनवाले उपस्थित होते.

हे ही वाचा : 

ST महामंडळ नवीन Bus खरेदीसाठी पंचवार्षिक योजना आणणार- Pratap Sarnaik

राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण, Sandeep Kusale ला अर्जुन पुरस्कार प्रदान

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा .

Latest Posts

Don't Miss