Vidhansabha Elections 2024: विधानसभा निवडणुकांच्या मतदानासाठी आता अवघे ५ दिवस उरले आहेत. संपूर्ण राज्यात एकाच टप्प्यात दिनांक २० नोव्हेंबर २०२४ रोजी निवडणूक होणार आहेत. तर त्यापुढे तीन दिवसांनी म्हणजे २३ नोव्हेंबर २०२४ रोजी राज्यात निकाल जाहीर होणार आहे. याच पार्श्वभूमीवर राज्याला जणू युद्धभूमीचं स्वरूप आलं असून सर्वच राजकीय पक्षांनी प्रचाराचा आणि सभांचा धडाका लावला आहे. महायुतीच्या उमेदवारांसाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे संपूर्ण महाराष्ट्रभरात सभा पार पडताना दिसून येत आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांची मुंबईत सभा पार पडणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी १४ नोव्हेंबरला पुन्हा एकदा महाराष्ट्र दौऱ्यावर असणार आहे. मुंबईमध्ये त्यांच्या दोन सभा आयोजित करण्यात आल्या असून खारघर आणि शिवाजी पार्क या ठिकाणी त्यांची सभा होणार आहे. यासाठी दोन्ही ठिकाणी वाहतुकीमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्यात आले आहेत. शिवाजी पार्क परिसरातील अनेक रस्त्यांवर नो पार्किंग झोन असणार आहे. यासोबतच, स्वातंत्र्यवीर सावरकर मार्ग, श्री सिद्धिविनायक मंदिर जंक्शन ते येस बँक पर्यंतची वाहतूक बंद राहणार आहे. पर्यायी मार्गांचा वापर करण्याचे आवाहन मुंबई पोलिसांकडून करण्यात आले आहे.
ठाकरेंच्या बालेकिल्ल्यात नरेंद्र मोदी यांची सभा असल्याने नरेंद्र मोदी या सभेत नक्की काय सांगतील याकडे सर्वांचेच लक्ष लागले आहे. पंतप्रधान मोदी यांच्या दौऱ्यानिमित्त कडक पोलीस बंदोबस्त करण्यात येणार आहे. यासाठी १४ नोव्हेंबरला सकाळी दहा वाजल्यापासून मध्यरात्रीपर्यंत रहदारीचे नियम असणार आहेत. नागरिकांसाठी नियुक्त पार्किंग क्षेत्रांची व्यवस्था करण्यात आली आहे. माहीम रेल्वे स्थानक ते टिळक पुलापर्यंत सेनापती बापट मार्गावर बस पार्किंग करण्यात आली आहे. यासोबतच, पांडुरंग बुधकर मार्ग, आर के ४ रोड आणि वरळी बस डेपो परिसरात अतिरिक्त बस पार्किंगची व्यवस्था करण्यात आली आहे. यासोबतच, रुईया जंक्शन जवळील लेडी जहांगीर रोड, नाथालाल पारीख रोड आणि माटुंग्यातील इतर ओळखले जाणारे भाग या ठिकाणी वाहतुकीची योग्य ती व्यवस्था करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांनी नागरिकांना निर्बंधाबाबत जागरूक राहण्याचे आवाहन केले आहे.
जाहीर सभेत सहभागी होण्यासाठी येणाऱ्या वाहनांना निर्देशित केलेल्या ठिकाणापासून निश्चित केलेल्या वाहनतळ ठिकाणी पार्क करण्याचे आवाहन पोलिसांकडून करण्यात आले आहे. पूर्व उपनगरे, ठाणे, नवी मुंबई येथून पुर्व दुतगती मार्गाने येणारी वाहने दादर टी. टी. सर्कल येथे उतरून, वाहने पाच गार्डन-माटुंगा आणि आर. ए. के. ४ रस्ता येथे पार्क करावी, असेही सांगण्यात आले आहे.
हे ही वाचा:
महाराष्ट्राचा मुख्यमंत्री कोण? चाणक्यनीतीने Amit Shah यांनी टाकली गुगली
अमित शाह यांनी उद्धव ठाकरे यांना दिले थेट आव्हान…, म्हणाले…