सध्या देशभरात दिवाळीचे वातावरण सुरु आहे. देशभरात प्रत्येक ठिकाणी दिवाळीचा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. दिवाळी सणाच्या निमित्ताने फटाक्यांची आतिषबाजी केली जाते. सध्या प्रदूषणाची समस्या जास्त प्रमाणात वाढत असल्याने उच्च न्यायालयाकडून फटके वाजवण्यावर निर्बंध लावण्यात आले आहेत. असे असले तरीही, फटाक्यांमुळे प्रदूषणाच्या पातळीत वाढ होताना दिसून येत आहे. देशात प्रदूषणाचं मुख्य ठिकाण देशाची राजधानी दिल्ली आहे, असं मानलं जायचं. अर्थात दिल्लीत प्रदूषण आहेच. आधी फक्त दिल्लीपुरता मर्यादित असलेला हा प्रश्न आता दिल्लीच्या गल्लीतून मुंबईपर्यंत येऊन ठेपलाय. मुंबईत प्रदूषणावर आता चर्चा केली जातेय, किंबहुना त्याबाबत चिंता व्यक्त केली जातेय.
देशातील ३ शहरे जगातील सर्वाधिक प्रदूषित शहरे म्हणून मानली जातात. त्यात दिल्लीचा प्रथम क्रमांक आहे. याबाबतचा रिपोर्ट स्विस ग्रुप आयक्यूएयर कडून देण्यात आला आहे. दिल्लीची हवा गुणवत्ता पातळी ४१२ इतकी आहे. लाहोरची २६२, बगदादची २०६, कराची या ठिकाणाची १९७, कुवैतची १६८ तर कोलकत्ताची हवा गुणवत्ता १६७ इतकी आहे. यांनतर, ढाका १५५, मुंबई १५४, सरजेवो १५३, दोहा १४९, जकार्ता १२६, काठमांडू ११५ आणि सौदी अरेबियामधील रियाध या ठिकाणाची हवा गुणवत्ता १०७ इतकी आहे.
हवेतील प्रदूषणावरून उच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर मुंबई महानगरपालिका प्रशासनाने मुंबईतील सर्व प्रमुख रस्ते पाण्याने धुण्याचा निर्णय काही दिवसांपूर्वी घेतला होता. त्यानुसार आता धूळ नियंत्रणासाठी १२१ टँकरसह इतर संयंत्रांचा वापर रस्ता धुण्यासाठी केला जातोय. वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर इमारतींची बांधकामं तुर्तास बंद ठेवण्याचे तसेच दिवाळीत फटाके फोडण्यावरही हायकोर्टाने निर्बंध आणले आहेत. मुंबई सह राज्यातील काही शहरातील हवेची गुणवत्ता (Air Quality) पातळी खालावलेलीच असल्याचं पाहायला मिळत आहे. राज्यातील काही शहरांमधील Air Quality Level मध्यम ते वाईट श्रेणीत आहे. दिवाळीच्या आधी थोड्या प्रमाणात पाऊस पडल्याने मुंबईच्या वातावरणात बदल दिसून आला होता. प्रदूषणाची पातळी काही प्रमाणात कमी झाल्याचे चित्र पाहायला मिळाले होते. परंतु, आता पुन्हा एकदा फटाक्यांच्या वापरामुळे मुंबईची हवा आणि हवेची गुणवत्ता खालावल्याचे दिसून येत आहे.
हे ही वाचा :
दिवाळीनिमित्त सोनाली कुलकर्णीच्या खास लूकनं वेधलं लक्ष
हैदराबादमधील केमिकल गोदामाला भीषण आग, ६ जणांचा मृत्यू…