Republic Day 2025: भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा सांस्कृतिक कार्य, माहिती तंत्रज्ञान मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते आज दिमाखात ध्वजवंदन करण्यात आले. वांद्रे पूर्व येथील मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात झालेल्या या समारंभास आमदार वरुण सरदेसाई, मुंबईं उपनगर जिल्ह्याचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, अतिरिक्त पोलिस आयुक्त परमजीत सिंग दहिया, पोलिस उपआयुक्त मनिष कलवानिया यांनी सलामी दिली.
या प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने पालकमंत्री ॲड.शेलार यांच्या हस्ते आंतरराष्ट्रीय खो खो क्रीडा स्पर्धेत प्राविण्य मिळालेल्या प्रशिक्षक, खेळाडू तसेच गुणवंत मार्गदर्शक व क्रीडापटू यांचा सत्कार करण्यात आला. यात केनिया पुरुष व स्त्री खो-खो संघाचे मुख्य प्रशिक्षक डॉ.नरेंद्र विठ्ठल कुंदर, खो-खो विश्वविजेत्या भारतीय संघामध्ये प्रतिनिधीत्व केलेले अनिकेत भगवान पोटे यांचा समावेश होता. त्याचप्रमाणे, सन २०२२-२३ या वर्षांकरिता क्रीडा मार्गदर्शक रमेश सकट, खेळाडू जान्हवी जाधव, अमन सिंग, रितिका महावर, अक्षता ढोकळे, प्रशांत गोरे, आदित्य खमासे आणि रितेश बोराडे यांना गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार देण्यात आले. सन २०२३-२४ या वर्षांकरिता क्रीडा मार्गदर्शक योगेश पवार, खेळाडू निधी राणे, अभिषेक प्रसाद, आंचल गुरव, अर्ना पाटील, आकाश गोसावी आणि नमन महावर यांना गुणवंत खेळाडू क्रीडा पुरस्कार देण्यात आले. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन महात्मा गांधी विद्यालयाचे शिक्षक राहुल प्रभू यांनी केले. या कार्यक्रमास माजी आमदार झिशान सिद्दिकी, ज्येष्ठ स्वातंत्र्य सेनानी, शहीद परिवाराचे कुटुंबिय, शासकीय अधिकारी, पोलिस, क्रीडा मार्गदर्शक क्रीडा पटू, विद्यार्थी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवनात ध्वजवंदन
भारताच्या ७६ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त विधान भवन, मुंबई येथे विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी ध्वज फडकवून राष्ट्रध्वजाला वंदन केले. विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. आपले विधानमंडळ लोककल्याणाचा विचार दीपस्तंभाप्रमाणे डोळ्यासमोर ठेवून वाटचाल करीत आहे, असे सांगून सभापती प्रा. शिंदे यांनी विधानमंडळाचे काम अधिक प्रभावी होण्यासाठी प्रश्नोत्तराचा तास विनाव्यत्त्यय होणे, समिती पद्धत अधीक सक्षम करणे, चर्चेनंतरच विधेयक संमत होणे आणि अर्थसंकल्पीय बाबींवर सदस्यांना मार्गदर्शन, ही आपली पीठासीन अधिकारी म्हणून कामकाज अग्रक्रमासाठी चतु:सुत्री राहील, असे यावेळी स्पष्ट केले. भारतीय प्रजासत्ताक आणि भारतीय राज्यघटना अमृत महोत्सवाच्या सर्वांना शुभेच्छा देत राज्यघटनेमुळे भारतातील संसदीय लोकशाही वैश्विक स्तरावर अधिक प्रभावी आणि प्रगल्भ झाल्याचे त्यांनी सांगितले.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांचा लोककल्याणकारी राज्य संकल्पनेचा विचार पुढे नेला. त्यांच्या जन्म त्रिशताब्दीनिमित्त प्रा. राम शिंदे यांनी अभिवादन केले. याप्रसंगी विधानमंडळ सचिवालयाचे सचिव (१) (कार्यभार) जितेंद्र भोळे, सचिव (२) (कार्यभार) डॉ. विलास आठवले यांच्यासह अधिकारी आणि कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
हे ही वाचा :
Mumbai Coastal Road ची उत्तर वाहिनी मुंबईकरांच्या सेवेत, मिळणार प्रदूषणापासून मुक्ती