Tandoor Roti Ban: मुंबईमध्ये वायु प्रदूषणाचा धोका दिवसेंदिवस वाढताना दिसून येतोय. अनेक प्रयत्न करून सुद्धा प्रदूषण थांबवण्यासाठी मुंबई महापालिकेला पूर्णपणे यश आले नाही. प्रदूषण थांबवण्यासाठी मुंबई महापालिकडून वेगवेगळ्या उपाययोजना राबवण्यात येत असतात. त्यात आता मुंबईतील कोळशावरील तंदूर भट्टी बंद करण्याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेने यासाठी ११० हॉटेल्सला नोटीस पाठवली आहे. इलेक्ट्रिक एलपीजी, सीएनजी, पीएनजीचा वापर करावा असं या हॉटेल्सला बजावण्यात आले आहे. ०८ जुलै पर्यंत कोळसा भट्टी बंद करण्याचे आदेश मुंबई महापालिकेकडून देण्यात आले आहेत. या आदेशांची अंमलबजावणी झाली नाही तर मात्र व्यावसायिकांवर कठोर कारवाई करण्यात येणार आहे. मुंबई उच्च न्यायालयाने या निर्णयाबाबत ०९ जानेवारीला आदेश दिले होते की, मुंबई महानगरपालिका हद्दीमधील कोळसा, लाकूड किंवा इतर पारंपारिक इंधन वापरून म्हणजे कोळशाच्या तंदूर भट्टीचा वापर करून तंदुरी रोटी बनवणाऱ्या हॉटेल मालकांना आता त्यांच्या हॉटेलमध्ये बदल करावे लागणार आहेत. कोळशाच्या भट्टीऐवजी पीएनजी, एलपीजी, इलेक्ट्रिक, सीएनजी आणि इतर हरित ऊर्जा वापरण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार महापालिकेने सूचना देऊन रेस्टॉरंटचालक व धाबा मालकांना नोटीस बजावली आहे. मुंबईत रेस्टॉरंट, बेकरी आणि धाबाचालकांची संख्या 1 हजारांच्या पुढे असण्याची शक्यता आहे. त्यातील अनेकांकडून विद्युत उपकरणाचा वापर केला जातो. मात्र, अनेकजण अजूनही जुन्याच पद्धतीचा अवलंब करत असून धाब्यांवर कोळशा भट्टीचाच वापर केला जातो. त्यामुळे, महापालिकेनं याची दखल घेत सक्तीने संबंधितांना नोटीस बजावली आहे.
महापालिकेने घेतलेल्या या निर्णयामुळे हॉटेलमध्ये नेहमीच ऑर्डर केली जाणारी रोटी आता मिळेल की नाही याबाबत प्रश्न उपस्थित केला जात आहे. घरच्या जेवणात नेहमीच भाकरी आणि चपाती तर असते पण बाहेर गेल्यानंतर तंदूर खाण्याची इच्छा अनेक जण व्यक्त करत असतात. त्यामुळे तंदूर रोटीची मागणी वाढताना दिसून येत आहे. त्यात आता मुंबई महापालिकेने घेतलेल्या निर्णयाला नागरिकांचा तसेच व्यावसायिकांचा कसा प्रतिसाद मिळतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.