मुंबई विद्यापीठाच्या मराठी विभागातर्फे प्रदान करण्यात येणारा पहिला ‘राजकवी भास्करराव रामचंद्र तांबे पुरस्कार’ शैक्षणिक वर्ष २०२३-२४ मध्ये एम.ए. मराठी पदवी परीक्षेत सर्वोच्च गुण मिळवणाऱ्या निखिल गौतम बागडे यांना प्रदान करण्यात आला. निखिल बागडे हे मुद्रित माध्यमात कार्यरत असलेले नावाजलेले मुद्रितशोधक असून, त्यांनी विविध राजकीय नेत्यांसाठी राजकीय लेखक म्हणून महत्त्वपूर्ण कार्य केले आहे. सध्या ते मुंबईतील नामांकित महाविद्यालयात प्राध्यापक पदावर कार्यरत आहेत.
हा पुरस्कार ‘राजकवी भास्करराव रामचंद्र तांबे’ यांच्या कुटुंबियांनी मुंबई विद्यापीठाला देणगी स्वरूपात दिलेल्या निधीतून स्थापन केला आहे. एम.ए.मराठी परीक्षेत प्रथम क्रमांक मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला हा सन्मान दिला जाणार आहे. मराठी भाषा गौरव दिनानिमित्त २७ फेब्रुवारी २०२५ रोजी हा पुरस्कार वितरण समारंभ कविवर्य कुसुमाग्रज मराठी भाषा व साहित्य भवन, विद्यानगरी, कलिना, मुंबई येथे आयोजित करण्यात आला.
मुंबई विद्यापीठाचे कुलगुरू मा. डॉ. रवींद्र कुलकर्णी यांच्या हस्ते निखिल बागडे यांना पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी मराठी विभाग प्रमुख डॉ. विनोद कुमरे यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. कार्यक्रमात विशेष अतिथी म्हणून प्रसिद्ध साहित्यिक मा. रामदास भटकळ उपस्थित होते. त्यांनी ‘मराठी भाषा स्वरूप आणि वाटचाल’ या विषयावर आपले विचार मांडले. तसेच ‘अ.का. प्रियोळकर पुरस्कार’ प्रदान सोहळा देखील याच वेळी संपन्न झाला.
कार्यक्रमाचे संयोजन डॉ. अनिल सपकाळ, डॉ. वंदना महाजन, डॉ. सुनील अवचार आणि डॉ. श्यामल गरुड यांनी केले.
या भव्य सोहळ्यामुळे मराठी भाषेच्या गौरवशाली परंपरेला नवा सन्मान प्राप्त झाला असून, उत्कृष्ट गुणवत्तेचा सन्मान करण्याची विद्यापीठाची परंपरा अधिक भक्कम झाली आहे.
हे ही वाचा:
दत्तात्रय गाडेच्या मैत्रिणीला पुणे पोलिसांनी भोरमधून बोलावलं; धक्कादायक माहिती समोर
Follow Us