दिवाळी काही दिवसांवर येऊन ठेपली आहे. या दरम्यान, अनेक राजकीय पक्षांनी सुद्धा दिवाळीची जय्यत तयारी करायला सुरवात केली आहे. दिवाळीच्या निमित्ताने प्रत्येक पक्षाने रस्ते आणि नाक्यावर तसेच चौकात कंदील लावण्याची सुरवात केली आहे. शिवसेना पक्षात पडलेली फूट आणि त्यानंतर महाराष्ट्रात घडलेल्या अनेक घडामोंडीच्या पार्शवभूमीवर मागील काही वर्षांपासून मुंबईतील अनेक भागांमधील शिवसेनेच्या आकाश कंदिलांची जागा भाजपने घेतल्याचे पाहायला मिळत आहे. मनसे या पक्षाचे स्थान अनेक वर्षांपासून अटळ ठेवले आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही राजकीय आकाश कंदिलाची बाजारपेठ तेजीत असल्याचे दिसून येत आहे. राजकीय पक्षांमध्ये कंदील झळकविण्याची स्पर्धा लागल्याचे पाहायला मिळत आहे.
गेल्या काही वर्षांपासून राजकीय कंदील तयार करणाऱ्यांची संख्या वाढली आहे. शिवसेनेत पडलेली उभी फूट आणि राज्यात राजकीय घडामोडी घडल्यानंतर शिवसेनेचे कंदील लागत असलेल्या ठिकाणी भाजपचे कंदील दिसू लागले. यंदा अनेक ठिकाणी शिंदे गटाचे कंदिलही दिसण्याची शक्यता आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने राजकीय कंदिलांच्या बाजारपेठेत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे. मात्र, काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षाने आखडता हात घेतला आहे. मागील वर्षी मनसेने चौकाचौकात, रस्त्यांवर जवळपास १०० कंदील लावले होते. शिवाय मनसेने शिवाजी पार्कमध्ये आयोजित केलेला दीपोत्सव लक्षवेधी ठरला होता. यंदा मनसेच्या कंदिलांच्या मागणीत जवळपास ३० ते ४० ने भर पडली आहे. तसेच भाजपनेही मागील वर्षीच्या तुलनेत अधिक कंदील लावण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र त्याच वेळी ठाकरे गटाच्या कंदिलांच्या मागणीत यंदा मोठी घट झाली असून मागील वर्षी जवळपास ८० कंदिल शिवसेनेने शहरात लावले होते. मात्र, यंदा तुलनेत शिवसेनेचे कंदील कमी असण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून कंदिलांच्या मागणीतही मोठ्या प्रमाणात घट झाली आहे.
हे ही वाचा :
DIWALI 2023: धनत्रयोदशीला करा ‘हे’ उपाय घरात सुख-समृद्धी नांदेल
निवडणूक आयोग हे भारतीय जनता पार्टीचा पिंजऱ्यातला पोपट – संजय राऊतांची टीका