सध्या लोकल गाड्यांच्या वेळापत्रकात कोणत्या ना कोणत्या कारणाने बदल होत असल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम रेल्वेच्या खाररोड ते गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरु असल्यामुळे २७ ऑक्टोबरपासून लोकलच्या काही फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. आता फेऱ्या रद्द करण्याचा कालावधी वाढवण्यात आला आहे. शुक्रवारपासून सुरु झालेल्या या मेगाब्लॉकमुळे प्रवाशांना मोठ्या प्रमाणात मनस्ताप होत आहे. शनिवार आणि रविवार या दोन दिवशी तुलनेने गर्दी कमी असल्यामुळे इतका त्रास झाला नसला, तरीही आज आठवड्याचा पहिला दिवस अर्थात सोमवार असल्याने बऱ्याच प्रमाणात गर्दी झाल्याचे स्थानकांवर पाहायला मिळाले.
पश्चिम रेल्वेवर खार-गोरेगाव स्थानकांदरम्यान सहाव्या मार्गिकेचे काम सुरू असून पश्चिम रेल्वे मार्गावरील २७ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबपर्यंत या ११ दिवसांत २,५२५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. २७ आणि २८ तारखेला प्रत्येकी २५६ फेऱ्या रद्द करण्यात आल्या होत्या. तर रविवारी ११६ अप आणि ११४ डाऊन अशा एकूण २३० लोकल फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत. २७ ऑक्टोबरपासून सुरु करण्यात आलेला ब्लॉक ६ नोव्हेंबरपर्यंत असणार आहे. या कालावधीत तब्बल २,५२५ लोकल फेऱ्या रद्द करण्यात येणार आहेत. दररोज ३१६ लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे प्रवाशांना त्रास सहन करावा लागणार आहे. लोकल फेऱ्या रद्द केल्यामुळे गर्दी वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
सोमवार ते शुक्रवार दररोज अप आणि डाऊन मिळून ३१६ लोकल फेऱ्या रद्द होणार आहेत. एक हजार फेऱ्यांपैकी २३ टक्के फेऱ्या रद्द होणार आहेत. तसेच, या काळात संपूर्ण वेळापत्रक बदलणार असल्याने प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार आहे. ट्रेन वेळेत असूनही गर्दी होत असते, त्यात आता लोकल फेऱ्या रद्द केल्या तर किती गर्दी होईल, आम्ही कसा प्रवास करणार? असा सवाल प्रवाशांकडून विचारला जात आहे.
हे ही वाचा :
MUMBAI UNIVERSITY: सिनेट निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर