मंत्रालयात कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसांच्या कृती आराखड्याच्या अंमलबजावणीबाबत करत असलेल्या कार्यवाहीची माहिती कौशल्य विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी पत्रकार परिषदेत दिली. जागतिक बँकेसोबत झालेल्या २३०० कोटी रूपयांच्या कराराच्या आधारे कौशल्य विकास विभागाच्या योजना प्रभावीपणे राबवणार आहोत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेमधून आगामी शंभर दिवसात ५० हजार युवांना प्रशिक्षण देणार असून मुंबईबरोबरच नागपूर,पुणे,नाशिक, अमरावतीसह छत्रपती संभाजीगर येथे महाराष्ट्र इंटरनॅशनल केंद्र कार्यरत करणार असल्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी सांगितले.
कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग व उच्च व तंत्रशिक्षण विभाग नोकरी देणा-या संस्थाबाबत सर्वसमावेशक असा एकत्रित कायदा करणार असून, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयातंर्गत ५०० विविध अभ्यासक्रमांचे व्हिडीओज ऑनलाईन उपलब्ध होणार आहेत. त्याचप्रमाणे १००० शाळांमध्ये करिअर मार्गदर्शन शिबीर आयोजित करण्यात येणार आहेत. जागतिक बँकेसोबत झालेल्या कराराआधारे आयटीआयची दर्जोन्नती करण्यात येणार आहे. राज्य नाविन्यता कौशल्य विकास सोसायटी मार्फत ‘आयटीआय’च्या कौशल्य विकास केंद्रामार्फत १ लाख १० हजार युवकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्याचबरोबर आयटीआय तसेच व्यवसाय शिक्षण संचालनालयाच्या परीक्षा ऑनलाईन करण्यासाठी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे. आगामी काळात १०० रोजगार मेळावे आयोजित केले जातील.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग शंभर दिवसाच्या कृती आराखड्यात विभागाचे संकेतस्थळ अद्यावत करणे, कार्यालयातील सोयी व सुविधा वाढवणे, सुकर जीवनमान, गुंतवणूक प्रसार, जनतेच्या तक्रारींचे निवारण, क्षेत्रीय कार्यालयांना भेटी या कृती कार्यक्रमावर भर देणार असून विभागाचा कारभार अधिक गतीमान करण्यात येणार आहे. १००० विविध सामंजस्य करार करण्यात आले आहे. कौशल्य विद्यापीठात मायक्रोसॉफ्टच्या सहाय्याने आर्टिफिशीयल इंटिलिजेसचे १० हजार युवांना प्रशिक्षण देणार असल्याचेही कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांनी यावेळी सांगितले.
हे ही वाचा :
घरच्याघरी पारंपरिक पद्धतीने हुरड्याचे थालीपीठ कधी खाल्ले आहे का? जाणून घ्या सोपी पद्धत