महाराष्ट्रातील लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुका पार पडल्या. या निवडणुकीनंतर आता आगामी महानगरपालिकेच्या निवडणुका कधी होणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राज्यातील सर्वच पक्षांकडून महापालिकेच्या निवडणुकांची तयारी सुरु करण्यात आली आहे. महापालिकेच्या निवडणुकीत महाविकास आघाडी एकत्र लढणार की स्वतंत्र्य मैदानात उतरणार हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे. त्यातच आता उद्धव ठाकरे गटाकडून आगामी महापालिकेच्या पार्श्वभूमीवर मोठी घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी महानगरपालिका, जिल्हा परिषद आणि नगर पंचायतीच्या निवडणुकीबाबत मोठी घोषणा केली आहे.
पत्रकार परिषदेत संजय राऊतांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांना महापालिकेच्या निवडणुकांबद्दल प्रश्न विचारण्यात आला तर त्यावर त्यांनी थेट निवडणुका स्वबळावर लढणार असल्याची घोषणा केली.” मुंबईसह नागपूर महापालिका आम्ही स्वबळावर लढू, काय होईल ते होईल. एकदा आम्हाला पाहायचंच आहे”, असे संजय राऊत म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, नागपूरलाही आम्ही स्वबळावर लढणार आहोत. उद्धव ठाकरेंनी आम्हाला तसे संकेत दिले आहेत. आत्ताच मी आमचे या शहराचे शिवसेनेचे प्रमुख प्रमोद मानमोडे यांच्याशी चर्चा केली. त्यानंतर आता असं ठरतंय की मुंबई असेल, ठाणे असेल, पुणे असेल, नागपूर असेल… कार्यकर्त्यांना संधी कधी मिळणार. आघाडीमध्ये लोकसभा, विधानसभेत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नाही. त्याचा फटका पक्षाला किंबहुना पक्षाच्या वाढीला बसतो. महापालिका जिल्हापरिषद आणि नगरपंचायतीत स्वबळावर लढून आपापले पक्ष मजबूत करावेत, असे संजय राऊत म्हणाले.