कांदा व दूध दर वाढीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्यावतीने बारामती आज आंदोलन करण्यात आले पक्षाच्या राष्ट्रीय कार्याध्यक्षा खासदार सुप्रियाताई सुळे यांच्या नेतृत्वात आंदोलन करण्यात आले. यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांसह युवा नेते योगेंद्र पवार आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. निवडणुकीपूर्वी सरकारने दिलेले शेतकऱ्यांना आश्वासन लवकरात लवकर पूर्ण करावे अशी मागणी यावेळी सुप्रियाताई सुळे यांनी केली आहे.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की, राज्यातील दूध उत्पादक शेतकऱ्यांना उचित दर मिळत नाही. त्यामुळे उत्पादन खर्चही निघत नाही परिणामी शेतकऱ्यांना नुकसान सहन करावे लागत आहे. त्यातच गेल्या ऑक्टोबर महिन्यात घोषित केलेले पाच रुपयांचे अनुदान देखील अनेक शेतकऱ्यांना मिळाले नाही. दूधाचा उत्पादन खर्च गृहीत धरता प्रति लीटर किमान चाळीस रुपये दर मिळावा अशी मागणी शेतकरी करीत आहेत. तरी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दूधाला वाजवी दर देण्याबाबत तातडीने निर्णय घ्यावा. असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना म्हटले आहे.
सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, याआधी ज्या ज्या वेळेस आरोप झालाय त्यावेळेस नैतिकतेच्या आधारे राजीनामा घेतला आहे. आता राजीनामा मागीतला आहे. पण तेच घेत नाहीत, हे तुम्हाला सरकारला विचारावं लागेल. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्याची मागणी होत आहे. सरकारनं संवेदनशीलपणे या सगळ्याचा विचार करावा. मला अजूनही तो दिवस आठवतोय, जेव्हा अशोक चव्हाण यांच्यावर आरोप झाले तेव्हा नैतिकतेच्या आधारावर त्यांनी राजीनामा दिला होता. त्यामुळे आता सरकारला ठरवायचंय की त्यांनी काय करावं असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
यावर सविस्तर बोलताना सुप्रियाताई सुळे म्हणाल्या की, राजकारण वेगळे आणि राजकीय जबाबदारी वेगळी. देवेंद्र फडणवीस सोडून सरकारमध्ये कुणीच ऍक्शन मोडवर दिसत नाही. माननीय शरद पवार साहेबांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पत्र लिहलं आहे. सगळ्यांना सुरक्षा मिळाली पाहिजे. पालकमंत्री पदात नेमकं काय आहे. त्याच्यासाठी एवढा वेळ का जातोय, पालकमंत्रीपदाबाबत एवढी चर्चा आम्ही कधीच ऐकली नाही. एवढी रस्सीखेच का केली जाते. एवढं गुढ याच्यामध्ये काय आहे मला माहीत नाही असे सुप्रियाताई सुळे यांनी स्पष्ट केले आहे.
HMPV विषाणू वाढत आहे. सरकारने याकडे लक्ष दिलं पाहिजे. ज्यावेळेस आमचं सरकार होतं त्यावेळेस राजेश टोपे यांनी खूप चांगलं काम केलं होतं. राज्य सरकारने योग्य उचलणं गरजेचं आहे. दिल्ली निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने योग्य पध्दतीने काम करावं असे सुप्रियाताई सुळे यांनी बोलताना सांगितले.
सुप्रियाताई सुळे बोलताना म्हणाल्या की,गेल्या २८ दिवसांपासून या प्रकरणाची चर्चा आहे. त्या कुटुंबाचे अश्रू पाहून अस्वस्थ वाटतं. या सरकारने थोडासा संवेदनशीलपणा दाखवावा. काल मुख्यमंत्र्यांचं विधान आलंय की कुणालाही सोडणार नाही. पोलिसांनी ज्या प्रकारची भाषा बजरंग सोनावणेंबाबत वापरली किंवा अंजली दमानिया किंवा सुरेश धस ज्या गोष्टी बोलत आहेत त्या प्रचंड अस्वस्थ करणाऱ्या आहेत. असं कसं चालणार? कुठल्याही गोष्टीमध्ये काही विषय असे असतात की ज्यात राजकारण बाजूला ठेवूनच काम करावं लागतं. या राज्यात माणुसकी आहे की नाही? त्या कुटुंबाला माणुसकीच्या नात्याने न्याय मिळायलाच पाहिजे असेही सुप्रियाताई सुळे म्हणाल्या.
हे ही वाचा:
आगामी निवडणुकींसाठी मनसे पक्षात होणार नवीन बदल; Sandeep Deshpande यांचे वक्तव्य