मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेची रक्कम १५०० रुपयांवरून २१०० रुपये करण्याची घोषणा महायुतीने निवडणूक जाहीरनाम्यात केलेली. त्यानुसार २१०० रुपये कधी मिळणार याकडे लाडक्या बहिणींचे लक्ष लागलंय. मात्र या बहिणींना डिसेंबर महिन्याचा हप्ता १५०० रुपयांप्रमाणेच मिळणार आहे. अद्याप २१०० रुपये मिळण्यासाठी लाडक्या बहिणींना आणखी थोडी वाट पाहावी लागणार आहे. १५०० रुपयांच्या ऐवजी २१०० रुपये नेमके कधी मिळणार? याकडे आता सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
राज्यात विधानसभा निवडणुकीच्या आधी तत्कालीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जाहीर केली होती. राज्यात ही योजना प्रचंड लोकप्रिय झाली. जवळपास अडीच कोटी महिलांनी या योजनेसाठी अर्ज केलेले. त्यानंतर जुलैपासून या बहिणींना दर महिन्याला १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली. तसेच नोव्हेंबर महिन्यात होणाऱ्या विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे पैसे एकत्रित देण्यात आले. विधानसभा निवडणुकीनंतर आता पहिल्यांदाच मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे पैसे मिळणार आहेत. यासाठीची प्रक्रिया देखील सुरू करण्यात आली आहे. आजपासूनच म्हणजेच २५ डिसेंबर पासून लाडक्या बहिणींच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात झालीये.
पहिल्या टप्प्यातच ३५ लाख महिलांना लाभ मिळणार आहे, त्यानंतर बाकी महिलांना पैसे दिले जाणार आहेत. या योजनेसाठी लागणारा साडेतीन हजार कोटी रुपयांचा निधी देखील मंजूर करण्यात आलाय. लाडकी बहिणी योजनाचा डिसेंबर महिन्याचा हप्ता मिळण्यास सुरुवात झाली आहे. हप्ता वितरण करत असताना यामध्ये दोन कोटी ३४ लाख महिलांचा समावेश असणार आहे, अशी माहिती महिला आणि बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी दिली आहे. ज्या महिलांना आधार कार्ड सीडिंगमुळे वंचित राहावं लागलं त्या महिलांच्या खात्यात सुद्धा हे पैसे येत्या चार ते पाच दिवसात टप्प्याटप्प्याने येणार आहेत. दोन कोटी ३४ लाख महिलांना याचा लाभ मिळणारे तर लाडक्या बहिणींना योजनेचा लाभ हा राज्याच्या तीन लाडक्या भावांमुळे मिळत असल्याचं तटकरी यांनी सांगितलंय. तसेच २१०० रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात होणार असल्याचं सांगितलं जातंय. त्यामुळे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतरच लाडक्या बहिणींना २१०० रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता आहे. हा अर्थसंकल्प लवकरच सादर करण्यात येणार आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना थोडा धीर धरावा लागणार आहे.
हे ही वाचा:
लाचखोर वनक्षेत्रपालाच्या घराची झडती; 57 तोळं सोनं अन् 1 कोटी 31 लाखांची कॅश
“आता खरी मजा आहे”, Manoj Jarange Patil यांची Devendra Fadnavis यांच्यावर टीका