पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातील कडेठाण या ठिकाणी लता धावडे या महिलेचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याची घटना घडली होती. मात्र, या महिलेचा मृत्यू बिबट्याच्या हल्ल्यात नाही, तर पुतण्यानेच दगडाने ठेचून हत्या केली. बिबट्याच्या हल्ला झाल्याचा बनाव केल्याचं पोलीस तपासात उघड झाला आहे. या प्रकरणी यवत पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. सतीलाल वाल्मिक मोरे आणि अनिल पोपट धावडे असं अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत, अशी माहिती यवत पोलिसांनी दिली आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.
नेमकं काय प्रकरण?
मिळालेल्या माहितीनुसार, दौंड तालुक्यातील वरवंड आणि कडेठाण गावच्या शिवेवर असलेल्या कडेठाण हद्दीमध्ये 7 डिसेंबर 2024 ला शेतात काम करणाऱ्या लताबाई बबन धावडे (वय 50,रा. कडेठाण) यांच्यावर बिबट्यानं हल्ला करून त्यांना उसाच्या शेतात फरफटत नेलं असं सांगण्यात आलं होते. या हल्ल्यात लता धावडे यांचा बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झाल्याचा दावा त्यावेळी तक्रारदार अनिल पोपट धावडेने केला. पोलीस आणि वन विभागाचे जबाबदार अधिकारी घटनास्थळी दाखल होण्यापूर्वीच त्यांचा मृतदेह घटनास्थळावरुन हलवण्यात आला होता.
वन्य प्राण्याचा हल्ला नसल्याचा…
वन विभागाने हा वन्य प्राण्यांच्या हल्ल्यात मृत्यू झाला नसल्याची शंका व्यक्त केली होती. मृत महिलेच्या मृतदेहाचं शवविच्छेदन करुन वन विभागाच्या नागपूर येथील प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळेत त्याची तपासणी करण्यात आली. मृत महिलेच्या शरीरावरती कोणत्याही वन्य प्राण्यानं हल्ला करून मृत्यू झाला नसल्याबाबतचा प्रादेशिक न्याय वैज्ञानिक प्रयोगशाळा नागपूर यांचा अहवाल पोलिसांना मिळाला. त्यानंतर पोलिसांनी तपासाला सुरुवात केली. आरोपींनी अनैतिक संबंधाच्या संशयातून लता धावडे यांना मारण्याचा कट रचला. त्यांचा दगडाने मारून खून पोलीस तपासात निष्पन्न झालं आहे.
दगडानं मारून हत्या
लता धावडे या गवत खुरपण्यासाठी शेतात गेल्यानंतर त्यांना सतिलाल यानं बाजुला बोलावलं. आपल्या पुतण्याच्या घरी काम करणारा व्यक्ती असल्यामुळे त्या त्याच्यासोबत बांधावर गेल्या. त्यावेळी त्यांंचं तोंड दाबून त्यांना बेशुद्ध केलं. त्यानंतर मग मुख्य आरोपी त्या ठिकाणी गेला. या दोघांनी मिळून दगडानं मारून खून केला आहे, अशी माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली. याबाबत पाटस पोलीस चौकीचे उपनिरीक्षक सलीम शेख यांनी तक्रार दिली. या गुन्ह्याचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण संपांगे हे करत आहेत.
हे ही वाचा:
‘नौलखा हार’ गाण्याच्या दिग्दर्शनावेळी आयुष संजीवला गंभीर दुखापत, तरीही काम पूर्ण करत जिंकली मनं
Dhananjay Munde Resignation: अखेर मुंडेंचा राजीनामा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून आदेश