अंतरवाली सराटीमध्ये २५ जानेवारीपासून मराठा आरक्षक आंदोलक मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले आहेत. उपोषणाच्या दरम्यान त्यांची तब्येत अचानक खालावली असून त्यांना सलाईन देखील लावण्यात आले. तब्येत बिघडल्यामुळे उपोषण स्थळी सर्वांच्या आग्रहाखातर त्यांनी पाणी प्यायले. भाजप आमदार सुरेश धस मंगळवारी त्यांना भेटले होते. त्यानंतर मनोज जरांगे यांनी सरकारला मोठे आवाहन केले आहे. आमच्या एकाही बांधवांचा जीव जायला नको पण मुख्यमंत्री उलट्या काळजाचा दिसतोय, असा संताप जरांगे यांनी व्यक्त केला. आता आज पुन्हा एकदा भाजप आमदार सुरेश धस मनोज जरांगे यांना उपोषणस्थळी भेट दिली आहे.
जरांगे यांच्या आंदोलनाची आणि त्यांनी केलेल्या मागण्यांची सरकारकडून दखल घेतली गेली नाही. त्यामुळे जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेतली. यावेळी जरांगे पाटील म्हणाले,” आम्ही आज, उद्या निर्णय करून उपोषण थांबणार आहोत. कारण संतोष देशमुख यांच्या हत्येचा खटला मागे राहू नये. आम्हाला तिकडेही बघायचे आहे. संतोष देशमुख यांचे बंधू धनंजय देशमुख यांचा विचार करून आम्ही आंदोलन थांबवत आहोत. आता मी वेगळ्या पद्धतीने आंदोलन करणार आहे. मी आता उपोषण करणार नाही. पण आता मी झक पक आंदोलन करणार आहे. उद्या दुपारी १२ वाजता उपोषण, सोडण्याबद्दल मराठा समाजाशी बोलून निर्णय घेणार आहे, असे जरांगे पाटील म्हणाले.
पुढे बोलताना जरांगे पाटील म्हणाले,” एक गोष्ट चांगली झाली की, फडणवीस यांना आम्ही आव्हान केलं होतं. आमच्या मागण्यांची अंमलबजावणी करणार की नाही? त्यांनी मागण्या मान्य न केल्यानं आता आमचे डोळे आणि समाजाचे डोळे उघडले. मराठा द्वेषी कोण आहे? हे समाजाला कळणं गरजेचं होतं. आता दूध का दूध, पाणी का पाणी झालं. फडणवीस द्वेष आणि सूड भावनेने वागतात, हे आता लोकांना कळलं असेल. मुख्यमंत्री मराठ्यांशी गद्दारी करणार नाही, असं वाटलं होतं. पण फडणवीस यांच्याकडून मराठ्यांबाबत गद्दारी आणि बेईमानी केली. फडणवीसांचा आनंद जास्त दिवस राहणार नाही. त्यांच्या आनंदावर विरजण पडेल, असा इशाराही जरांगेनी फडणवीसांना दिला.
हे ही वाचा :