spot_img
Wednesday, February 19, 2025

Latest Posts

Ola, Uber, Rapido एकाच नियमावलीअंतर्गत आणणार, Pratap Sarnaik यांचे निर्देश

एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी या ‘एस. टी.’च्या प्रकल्पात प्रत्येक जिल्ह्यात २५ तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर १०० खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे.

राज्यातील खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या कंपन्यांना एकाच शासकीय नियमावलीअंतर्गत आणण्यासंदर्भात मंत्रालयात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. ओला, उबेर व रॅपिडोसारख्या खासगी प्रवासी वाहतूक करणाऱ्या सर्व कंपन्यांना एकाच नियमावलीअंतर्गत आणणार असल्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी सांगितले. प्रवासी सुरक्षा, कार पुलींग, लायसन्स, ट्रॅफिक समस्या यासंदर्भातील पारदर्शक तक्रार यंत्रणा तातडीने तयार करण्याचे निर्देश परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिले.

परिवहन मंत्री सरनाईक म्हणाले की, खासगी प्रवासी वाहतूक कंपन्यांसंदर्भात केंद्र सरकारने आणलेल्या धोरणाचा अभ्यास करून, या कंपन्यांना एकाच परिवहन नियमाअंतर्गत एकत्रित आणणे गरजेचे आहे. प्रवासी सुरक्षेला प्राधान्य देण्यात यावे. सर्व प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपन्यांअतर्गत चारचाकी, बाईक, टॅक्सी यांचा समावेश करण्यात येणार आहे. बाईक चालविण्यासाठी महिला चालकांनाही प्राधान्य देण्यात यावे, जास्तीत जास्त रोजगार कसा निर्माण करता येईल यासाठी प्राधान्य द्यावे. तसेच त्यांच्या सुरक्षेसंदर्भात कंपन्यांनी उपाययोजना कराव्यात, अशा सूचनाही मंत्री सरनाईक यांनी दिल्या. खासगी वाहतूक व्यवस्था, सुस्थितीत असलेली वाहने, प्रवाशांची सुरक्षा, हेल्मेट, महिला चालकांची सुरक्षा, तत्पर सेवा इत्यादी बाबींचा वाहतूक धोरणात समावेश करण्यासंदर्भातील सादरीकरण यावेळी परिवहन आयुक्त विवेक भीमनवार यांनी केले.

राज्यातील अनेक बसस्थानके बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा, या तत्वावर विकसित करण्यात येत आहेत. एस. टी. कर्मचाऱ्यांसाठी या ‘एस. टी.’च्या प्रकल्पात प्रत्येक जिल्ह्यात २५ तर मुंबईतील बोरिवली येथील जागेवर १०० खाटांचे रूग्णालय सुरू करण्यात येणार आहे. या रूग्णालयात एस. टी. कर्मचारी व त्यांच्या कुटुंबियांसाठी महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून उपचार करण्यात येतील, तसेच पाच लाखांपर्यंतच्या शस्त्रक्रियांचा खर्च राज्यशासन करेल, असेही परिवहन मंत्री सरनाईक यांनी सांगितले. सध्या राज्यभरात विविध ठिकाणी बांधा – वापरा आणि हस्तांतरित करा या तत्त्वावर ‘एसटी’च्या जागांचा विकास केला जात आहे. भविष्यात या रुग्णालयांमध्ये ‘एसटी’ कर्मचारी व त्यांच्या कुटुंबीयांना कॅशलेस वैद्यकीय सुविधा पुरवण्यात येतील. पुणे, कोल्हापूर, पुसद, वाशिम येथे रूग्णालय उभारण्यासंदर्भातील सादरीकरण करण्यात आले. यावेळी परिवहनचे अपर मुख्य सचिव संजय सेठी, परिवहन आयुक्त विवेक भीमनवार, एसटी महामंडळाचे उपाध्यक्ष व व्यवस्थापकीय संचालक डॉ. माधव कुसेकर यांच्यासह प्रवासी वाहतूक पुरवठादार कंपनीचे प्रतिनिधी दूरदृश्यप्रणालीद्वारे उपस्थित होते.

हे ही वाचा:

अखेर मेटाने मागितली माफी!, मार्क झुकेरबर्गच्या भारताबद्दलच्या टिप्पणीनंतर झाला गोंधळ…

वाल्मिक कराडला Mococa कायदा लावल्याने समर्थकांकडून आक्रमक भूमिका; परळी बंदची हाक

Follow Us

टाईम महाराष्ट्रचे अपडेट्स मिळवण्यासाठी आम्हाला फॉलो करा.

Latest Posts

Don't Miss