छत्रपती शिवाजी महाराज यांची आज १९ फेब्रुवारीला ३९५ वी जयंती आहे. महाराष्ट्रासह देशभरातील अनेक ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येत आहे. राज्याचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांनी युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जन्मस्थळी किल्ले शिवनेरी येथे छत्रपती शिवरायांचे दर्शन घेऊन त्यांना अभिवादन केले. तर शिवजयंतीच्या निमित्ताने देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोशल मीडियावर मराठीतून पोस्ट शेअर करत शिवरायांना अभिवादन केले आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले,”छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त मी त्यांना अभिवादन करतो. त्यांच्या पराक्रमाने आणि दूरदर्शी नेतृत्वाने स्वराज्याची पायाभरणी केली, ज्यामुळे अनेक पिढ्यांना धैर्य आणि न्यायाची मूल्ये जपण्याची प्रेरणा मिळाली. ते आपल्याला एक बलशाली, आत्मनिर्भर आणि समृद्ध भारत घडवण्यासाठी प्रेरणा देत आहेत.”
तर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी देखील पोस्ट करत शिवजयंतीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन केले आहे. “हिंदवी स्वराज्याचा” उद्घोष करणारे छत्रपती शिवाजी महाराज जी यांचे जीवन नीती, कर्तव्य आणि धर्मपरायणता यांचा संगम होते. कट्टरपंथी आक्रमकांच्या विरुद्ध जीवनभर संघर्ष करून सनातन स्वाभिमानाचे धर्म ध्वज रक्षक छत्रपती शिवाजी महाराज जी एक राष्ट्रनिर्माता म्हणून सदैव स्मरणीय असतील. शिवजयंतीच्या निमित्ताने अद्वितीय साहसाचे प्रतीक, छत्रपती शिवाजी महाराज जी यांना कोटी कोटी नमन !” असे अमित शाह म्हणाले.