महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण देशभरात गणेशोत्सव हा सण मोठ्या उत्साहाने साजरा केला जातो. मात्र आता या संदर्भात एक महत्त्वाची बातमी समोर आली आहे. यंदाच्या गणेशोत्सवामध्ये प्लास्टर ऑफ पॅरिसच्या मूर्तीना बंदी असणार आहे. माघी गणपतीपाठोपाठ आता मुंबईत मोठ्या प्रमाणावर साजऱ्या करण्यात येणाऱ्या गणेशोत्सवातही नियमांची आडकाठी येण्याची शक्यता आहे. नुकत्याच झालेल्या माघी गणेशोत्सवानंतर सार्वजनिक मंडळाच्या पीओपीच्या गणेशमूर्तीना तलावांमध्ये विसर्जन करण्याची परवानगी देण्यात आली नव्हती. यावरून बराच वाद निर्माण झाला होता. मात्र, मुंबई महानगरपालिका प्रशासन शेवटपर्यंत ठाम राहिले आहेत.
सार्वजनिक उत्सव हा पूर्णपणे पर्यावरणपूरक पद्धतीने तसेच सुरळीतपणे पार पडण्याच्या दृष्टीने, मूर्तिकारांना तात्पुरते मंडप उभारण्याकरिता आणि विभाग कार्यालयातील संबंधित अधिकारी आणि कर्मचारी यांचे मार्गदर्शनाकरिता सूचना करण्यात आल्या आहेत. पालिकेकडून नियमावली आल्याने आता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ, मूर्तिकार आणि राजकीय नेते काय भूमिका घेतात हे पाहणं महत्त्वाचे आहे. कोर्टाच्या नियमांचे पालन करूनच मूर्ती घडवावी असे निर्देश परिपत्रकात देण्यात आले आहेत. आताही हाच निर्णय असल्याने आगामी काळात त्यांच्या भूमिकांकडे सर्वांचं लक्ष असेल.
मुंबई महानगरपालिकेच्या परिपत्रकात नेमकं काय आहे?
मा. उच्च न्यायालय, मुंबई येथे दाखल PIL 96 of 2024 मधील दिनांक ३०.०१.२०२५ रोजीच्या अंतरीम आदेशानुसार, पीओपी मूर्तींना पूर्णपणे प्रतिबंध करण्यात आले असून केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाने दि. १२.०५.२०२० रोजी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याचे आदेश बृहन्मुंबई महानगरपालिका यांना दिलेले आहेत. सदर आदेशांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्यात यावी…
* सार्वजनिक / खाजगी जागेवरील मंडपांकरिता अर्ज सादर करतेवेळी गतवर्षीची मंडप परवानगी सोबत जोडण्यात यावी.
* मूर्तीकारांना पर्यावरणपूरक मूर्ती बनविण्यास प्रोत्साहन मिळावे याकरीता बृहन्मुंबई महानगरपालिकेमार्फत मुर्तीकारांना निःशुल्क मंडप परवानगी दिली जाईल.
* येथे केवळ पर्यावरण पूरक मूर्ती घडविल्या जातात असा फलक, मंडपाच्या प्रवेशव्दारावरील दर्शनी भागात्त सुस्पष्ट दिसेल अशा रितीने प्रदर्शित करावा.
* मूर्तीकारांना मंडप उभारण्यासाठी रस्ते आणि फूटपाथवर खड्डे खणण्यास प्रतिबंध असून खड्डे खणल्याचे आढळून आल्यास २००० प्रती खड्डा याप्रमाणे दंडात्मक कारवाई करण्यात येईल.
* उत्सवावादरम्यान मूर्तीचे आगमन आणि विसर्जन सुकर होईल व स्थापनेदरम्यान मूर्तीचे स्थैर्य राहील एवढया उंचीची मूर्ती घडविण्यात यावी.
Follow Us